पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवैध हुक्का पार्लर चालविणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल बैठक ढाबाला आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचा जोरदार दणका दिला आहे. हॉटेल मालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या वेळी हुक्क्यासाठी लागणारा सुमारे पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील सर्व आस्थापना चालक यांनी त्यांना नेमून दिलेल्या नियमांचे व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे; अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन केले होते.
तरीदेखील काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत होते. दरम्यान, लोणावळा हद्दीतील हॉटेल बैठक ढाबा या हॉटेलमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती. त्याआधारे शनिवारी मध्यरात्री त्यांनी त्यांच्या पथकासह हॉटेल बैठक ढाबा (जुना मुंबई- पुणे महामार्ग, कार्ला) याठिकाणी छापा टाकला.
हॉटेलचालक हॉटेलमध्येच अवैध हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी विक्रीसाठी असलेले हुक्क्यासाठीचे पॉट, तंबाखुयुक्त फ्लेवर्स, फिल्टर, पाइप असा एकूण ४४ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस नाईक सचिन गायकवाड यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा पोलीस स्टेशन येथे कृष्णा नाथा राठोड, हॉटेल मालक प्रताप कृष्णा डिंमळे (४२) बिपीन्छु मार परमेश्वर महतो (३०) यांच्याविरोधात सिगारेट व इतर तंबाखुजन्य उत्पादन कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.