कोटक्कल (केरळ) – मणिपूर प्रश्नावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये रणकंदन होत असताना, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी गुडघ्याच्या दुखापतीवर आयुर्वेदिक उपचारांसाठी केरळमधील प्रसिद्ध कोटक्कल आर्य वैद्यशाळेत पोहोचले आहेत. राहुल गांधींनी श्री विश्वंभरा मंदिरात पूजाही केली आणि कथकली नृत्याचा आनंद घेतला. यावेळी राहुल गांधींसोबत कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि पक्षाचे आमदार एपी अनिल कुमारही उपस्थित होते.
भगवान विश्वंभराला समर्पित हे मंदिर कोटक्कल आर्य वैद्यशाळेला भेट देणाऱ्या रुग्णांसाठी आराम आणि विश्रांतीचे ठिकाण आहे. मंदिराला भेट दिल्यानंतर राहुल गांधींनी आर्य वैद्यशाळेच्या प्रसिद्ध पीएसव्ही नाट्यसंगममध्ये कथकली नृत्याचा कार्यक्रम पाहिला. प्रसिद्ध मल्याळम लेखक एमटी वासुदेवन नायर हे देखील उपचारासाठी रुग्णालयात पोहोचले असून ते राहुल गांधींच्या शेजारच्या खोलीत दाखल आहेत. वासुदेवन नायर यांनीही राहुल गांधींसोबत कथकली नृत्य पाहिले.
राहुल गांधींनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांनी पीएसव्ही नाट्यसंगमने आयोजित केलेल्या कथकली नृत्याचा मनापासून आनंद घेतला. नाट्यसंगम हे एक प्रसिद्ध शास्त्रीय केंद्र आहे जे महान वैद्य रत्नम पीएस वॉरियर यांनी आर्य वैद्यशाला कोटक्कल यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले होते.
भगवान विश्वंभराला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. भगवान विश्वंभराला चार हात असून त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ आहे. राहुल गांधींनी भारताच्या कलेची आणि त्याच्या वैविध्यपूर्ण इतिहासाची प्रशंसा केली आणि लिहिले की भारतातील प्रत्येक कला ही त्याच्या विविध इतिहास आणि संस्कृतींचे प्रतिबिंब आहे.