पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या 14 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच मॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आणखी निर्बंध लादले गेल्यास परवड नको, याकरिता नागरिकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी मॉल व किराना विक्री दुकानांसमोर रांगा लावल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी पहायला मिळाले. मॉल्स व्यवस्थापनाने देखील सुरक्षित अंतर ठेऊन ग्राहकांच्या रांगा लावून घेतल्या होत्या.
पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर व जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. दररोज करोनाबाधितांची आकडेवारी नव-नवे विक्रम प्रस्थापित करत असल्याने, जिल्ह्यात 14 एप्रिलपर्यंत निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. तर गतवर्षी 23 मार्चला लॉकडाऊन केल्याने झालेली गैरसोय टाळण्याकरिता नागरिकांनी थेट किराणा मालाच्या दुकानाचा रस्ता धरला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कंपनी कामगार, आयटीयन्स, चाकरमाने, श्रमिक व कष्टकरी असे संमिश्र वर्गाचे कर्मचारी आहेत. या सर्वच घटकांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. आता कुठे उद्योगनगरी सावरत असताना मिनी लॉकडाऊनची घोषणा झाल्याने, नागरिकांच्या मनात शंका-कुशंका निर्माण होऊ लागल्या आहेत. पूर्णत: लॉकडाऊन झाल्यास खाण्या-पिण्याची आबाळ होऊ नये, याकरिता किमान पोटापाण्याचा प्रश्न तरी मिटावा, म्हणून किराणा माल भरण्याकडे नागरिकांचा कल होता. विशेषत: लॉकडाऊनच्या चर्चांनंतर किराणा व्यावसायिकांनी सर्वच वस्तूंचे दर वाढविले असल्याने किराणा दुकानांच्या तुलनेत स्वस्त अन्न धान्य विकणाऱ्या मॉल्सच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या.