कोझिकोडे – प्रख्यात उद्योगपती, मल्याळी चित्रपट निर्माते आणि मातृभूमी दैनिकाचे व्यवस्थापकीय संपादक पी व्ही गंगाधरन,यांचे आज निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. “ओरू वादक्कन वीरगाथा” आणि “अंगाडी”अशा गाजलेल्या अनेक सिनेमांची निर्मीती त्यांनी केली होती. गेले काही दिवस ते आजारी होते. आज पहाटे रूग्णालयात त्यांचे निधन झाले. ते काही काळ राजकारणातही सक्रिय होते व त्यांनी अनेक वर्षे कॉंग्रेस मध्ये काम केले आहे.
सिनेमा वर्तुळात पीव्हीजी म्हणून प्रसिद्ध असलेले, गंगाधरन हे गृहलक्ष्मी प्रॉडक्शन्स या चित्रनिर्मीतीच्या कंपनीचे प्रमुख होते. या कंपनीच्या बॅनरखाली. 20 हून अधिक चित्रपटांची निर्मिती झाली, त्यांना दोन वेळा राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कार मिळाले.
चित्रपट निर्मितीतील त्यांच्या विपुल कारकिर्दीव्यतिरिक्त, गंगाधरन यांनी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म प्रोड्यूसर असोसिएशनचे उपाध्यक्ष,आणि केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. 2011 मध्ये त्यांनी कोझिकोड उत्तर मतदारसंघातून राज्य विधानसभेची निवडणूकही लढवली होती.केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान, मुख्यमंत्री पी विजयन यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.