मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेले ऍलक्सी नवालनी हे सायबेरीयाच्या कोठडीमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांचा शोध घेतला जात होता. नवालनी यांना कोणत्या तुरुंगात ठेवले गेले आहे, याबाबत रशियाच्या प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती. अखेर त्यांचा शोध लागल्याचे त्यांच्या सहकारी कियारा यारमिश यांनी म्हटले आहे.
नवालनी आता यमाल-नेनेट्स स्वायत्त जिल्ह्यातील खार्पच्या सेटलमेंटमध्ये आयके-३ मध्ये आहे. हा भाग राजधानी मॉस्कोपासून १५० किलोमीटर इशान्येला आणि अत्यंत दुर्गम, डोंगराळ आहे. राजकीय कैद्यांना सर्वसामान्य जनतेपासून दूर ठेवण्यासाठीची ही एक वसाहत आहे. नवालनी यांच्या वकिलांनी सोमवारीच त्यांची भेट घेतल्याचेही यारमिश यांनी म्हटले आहे.
नवालनी यांच्याशी ११ डिसेंबरपासून कोणताही संपर्क होऊ शकलेला नव्हता. न्यायालयाच्या सलग दोन सुनावण्यांनाही ते उपस्थित नव्हते. नवालनी इतका काळ कधीच लपून राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या ठावठिकाण्याविषयी उत्सुकता आणि चिंता निर्माण झाली होती. अतिरेकी समुदाय निर्माण करणे, अतिरेकी कृत्यांना वित्तपुरवठा करणे आणि इतर अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर नवालनी यांना ऑगस्टमध्ये १९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हवेचा झरोका नाही, अन्नही सुमार दर्जाचे
नवालनी यांना ज्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे, तेथे मोकळी हवा येऊ शकेल, असा झरोकाही नाही. तसेच त्यांना देण्यात येणारे अन्नही सुमार दर्जाचे आहे, असेही यारमिश यांनी म्हटले आहे. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. नवालनी हे पुतीन यांना आव्हान देऊ शकणारे प्रभावी नेते असल्यामुळे त्यांना सायबेरीयाला हलवण्यात आले आहे.