Pushkar Jog : बॉलीवूडसह काही मराठी चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालण्यास सज्ज झाले आहे. नुकताच झिम्मा 2 हा चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने संबंधित चित्रपटांना त्याचा चांगलाच फटका बसल्याचा दावा काही निर्मात्यांकडून केला जात आहे. अशातच 2 फेब्रुवारी 2024 रोजी पुष्कर जोग आणि सई ताम्हणकर यांचे दोन वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावरून पुष्कर जोगने संताप व्यक्त केला आहे.
पुष्कर जोग आणि पूजा सावंत यांच्या ‘मुसाफिरा’ या चित्रपटाचे पहिलं पोस्ट लॉन्च करण्यात आले. याच दिवशी ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत आहेत. दोन्ही चित्रपटांच्या सारख्या तारखांमुळे पुन्हा एकदा याचा मराठी सिनेक्षेत्राला फटका बसणार असं स्पष्ट मत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत पुष्कर जोग यांने मांडले आहे.
पुष्कर जोगने इस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आम्ही ‘मुसाफिरा’च्या प्रदर्शनाची तारीख आधीच ठरवली होती आणि या (श्रीदेवी प्रसन्न) चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज जाहीर केली. निर्माते एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत का? एक फोन कर. मेसेज करा, पण यातल काहीच करत नाहीत. बॉक्स ऑफिस क्लॅश होऊ नये म्हणून मी 3 महिने आधीच चित्रपटाची घोषणा केली होती. तरीही असं होणं हे अजिबात योग्य नाही.”
पुष्करने शेवटी या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, “माझी विनंती आहे की श्रीदेवी प्रसन्न आधी रिलीज करावा अथवा रिलीज डेट पुढे ढकलावी. मी आधी सुद्धा असा अनुभव घेतलाय. यामुळे कोणालाच फायदा होत नाही. याआधी सुद्धा बापमाणुस सिनेमाच्या रिलीज वेळी पुष्करला रिलीज डेट पुढे ढकलावी लागली होती.” पुष्करने या पोस्टबरोबर सिद्धार्थ-सईच्या चित्रपटाची 2 फेब्रुवारी ही तारीख दर्शवणारं पोस्टरही शेअर केले आहे.