वालचंदनगर पोलिसांकडून कारवाई
लासुर्णे- इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात दरोडा, खुनाचा प्रयत्न करुन समाजामध्ये दशहत माजविणाऱ्या निरंजन लहू पवार टोळीतील सहा जणांवर वालचंदनगर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानूसार (मोका) नूसार कारवाई केली असल्याचे वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निरंजन लहू पवार, नितीन गुलाब मदने (रा.दोघे, खोरोची), समिर रसूल मुलाणी(रा.काटी), करण नाना शेंडे, प्रवीण संजय शेंडे (रा.दोघे, वरकुटे), मारुती उर्फ राजू पमल जाधव (रा.पिटकेश्वर) यांच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. दि. 29 जूनला या सहा जणांनी जंक्शन (ता.इंदापूर) जवळ कऱ्हाड तालुक्यातील व्यापाऱ्याच्या चारचाकी गाडीला दुचाकी आडवी लाऊन दरोडा टाकीत एक लाख 85 हजार रुपयांची रोख रक्कम लुटली होती. संबंधित टोळीचा प्रमुख निरंजन पवार याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेवून दरोड्याचा तपास लावला होता.
पवार याला अटक केल्यानंतर पोलिसांनी इतर पाच आरोपींना शिताफतीने सापळा रचून अटक केली होती. या सर्व आरोपींनी 2017 ते 2019 या कालावधीमध्ये दरोडे, खुनाचा प्रयत्न करणे तसेच शस्त्र बाळगण्याचे प्रकार करुन समाजामध्ये भितीचे वातावरण तयार केले होते. यामुळे वालचंदनगर पोलिसांनी या सहा जणांवर मोक्कातंर्गत कारवाई केली आहे. परिसरातील अनेक आरोपीचा वालचंदनगर पोलिसांच्या हिट लिस्टमध्ये समावेश असून पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.