चंदीगड – पंजाबमधील काँग्रेस सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. शनिवारीच शिरोमणी अकाली दल (एसएडी) कार्यकर्त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी चंदीगडमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या घराला घेराव घातला होता.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आम्ही पेट्रोल 10 रुपयांनी आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर लागू होणार आहेत.
We have decided to decrease petrol and diesel prices by Rs 10 per litre and Rs 5 per litre, respectively, to be effective from midnight today: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/Q3PP1scPeo
— ANI (@ANI) November 7, 2021
– केंद्राने कमी केले उत्पादन शुल्क
दिवाळीची भेट म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांनी कपात केली होती. यानंतर अनेक राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटचे दर कमी केले. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.
– असे आहेत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
आज (रविवार) दिल्लीत पेट्रोलचा दर 103.97 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.14 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 101.40 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
दरम्यान, राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल-डिझेल भारतात सर्वात महागड्या दराने विकले जात आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर 116 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 100.21 रुपये प्रति लिटर आहे.