पुणे – परराज्यात नियुक्तीस असलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या पुण्यातील घरात लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या 43 लाख 50 हजार रुपयांच्या दागिण्यांची चोरी करण्यात आली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय संभाजी डोईफोडे(64, रा.ज्ञानेश्वरी बंगला, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
डोईफोडे हे महसूल विभागातील निवृत्त अधिकारी आहेत. तर त्यांचा मुलगा जम्मू-काश्मीरमध्ये आयएएस अधिकारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांचा मुलगा आयएएस अधिकारी आहे. दिवाळीनिमीत्त तो पुण्यातील घरी आला होता.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात आठ सदस्य होते. आयएएस अधिकारी त्याची पत्नी, बॉडीगार्ड, चालक, आई-वडिल आणी भावाचे कुटूंब अशा व्यक्ती घरात होत्या. घरातील मुख्य दरवाजा लावल्यानंतर कुटूंब झोपी गेले होते. रखवालीसाठी त्यांनी एक श्वानही पाळले होते. तरीही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांच्या मते चोरटयांनी खिडकीवाटे एखाद्या लहान मुलास घरात सोडून घराचा मुख्य दरवाजा उघडला असेल. घराच्यामागे रेल्वे ट्रॅक आणि शेती आहे. तेथून चोर पळून गेल्याची शक्यता आहे.
कुटूंबानी लक्ष्मीपुजनासाठी घरातील 150 तोळे वजनाचे 37 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तीन लाखाचे हिऱ्याचे दागिने, 50 हजार रुपयांचे चांदिचे ताट आणि अडीच लाखाची रोकड पुजेसाठी ठेवली होती. चोरट्यांनी बंगल्याच्या गेटचे कुलूप आणी खिडकीचा गज कापून आत प्रवेश केला आणि चोरी केली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.