पुणे, दि. 4 -साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा सण उद्या (बुधवारी) साजरा होत आहे. विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून, त्याच्यावर विजय मिळवून सद्गुण, सत्प्रवृत्ती यांच्या प्रतिकात्म सोन्याची लूट करणे असे या सणाचे महत्त्व आहे.
घटस्थापना करून दहा दिवस देवीस्वरूपातील शक्तीचा जागर केला जातो. त्यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी साजरी केली जाते. यालाच दसरा असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी अनेक सकारात्मक कामे केली जातात.
वाहन, सोने खरेदी, घर खरेदी, अनेक वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावरील नवीन कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी सरस्वती पूजनाबरोबरच शस्त्रपूजनही केले जाते. सीमोल्लंघन करून विजयोत्सव साजरा केला जातो. आपट्यांच्या पानांच्या रुपात सोने लुटून एकमेकांना सदिच्छा दिल्या जातात. यंदा करोनाचे सावट दूर झाल्यानंतर दोन वर्षांनंतर हा सण साजरा होत आहे. शहरात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला खरेदीचा माहोल असून, बाजारपेठा फुलल्या आहेत. सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही काळ या उत्साहावर पाणी पडले. मात्र झेंडूची फुले, तोरण, पूजेचे साहित्य खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली.