पुणे –महापालिका सदस्यांची मुदत संपताच शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोझर फिरण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या नऊ दिवसात तब्बल 1 लाख 37 हजार चौरसफूट बांधकामे जमीनदोस्त केली असून एक हजारहून अधिक टपऱ्या, पथारी तसेच इतर अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकाम होत असताना हे रोखण्याची जबाबदारी असलेले अतिक्रमण निरीक्षक कुठे गायब होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात गेल्या काही वर्षांपासून रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. तसेच फ्ल्केस, बोर्ड अनधिकृत जाहिरांतीमुळे शहरात विद्रूपीकरणही वाढले आहे, अशा स्थितीत अनेकदा न्यायालयाकडून तसेच स्थानिक आमदारांकडूनही महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. मात्र, त्यानंतर केवळ दिखाऊ कारवाई करून अतिक्रमण तसेच आकाशचिन्ह विभागाने हात झटकले आहे. तर, या अतिक्रमणांसाठी राजकीय मदत घेऊनच पालिकेने त्यांना अभय दिलेले होते. प्रत्यक्षात अतिक्रमण निरिक्षकांची जबाबदारी अतिक्रमणे थांबविणे आणि झालीच ती लगेच नोटीस देऊन काढण्याची असते. मात्र, स्थानिक पातळीवर लागेबंधे असल्याने ही कारवाई होत नव्हती. त्यामुळे आता प्रशासक आल्यानंतर कारवाईला वेग आला आहे.
पुणे : शहरातील सर्वच भागातील अतिक्रमण काढली जात असून इमारत गॅलरी, टपऱ्या अगदी दुकानांचे वाढीव भागात लावण्यात आलेले बोर्डही काढण्यात येत आहेत.
बदल्या केवळ नावालाच…
महापालिकेच्या सर्व विभागात प्रत्येक तीन वर्षानंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. पालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये असून पालिकेकडे केवळ 10 अतिक्रमण निरीक्षक आहेत. तर, पालिकेने खासगी तत्वावर सहायक अतिक्रमण निरिक्षक भरले आहेत. मात्र, अनेक अतिक्रमण निरीक्षक एकाच क्षेत्रीय कार्यालयात ठाण मांडून असतात. त्यांच्या नियमित तीन वर्षांनी इतर क्षेत्रीय कार्यालयात बदली होणे अपेक्षित असताना राजकीय दबाव आणत या बदल्या केल्या जात नाहीत तसेच बदल्या झाल्या तरी अवघ्या महिन्याभरात हे निरीक्षक पुन्हा मुळच्या जागी वरिष्ठांच्या आशिर्वादाने पुन्हा जुन्या जागीच कार्यरत होत आपले वसूलीचे कामकाज सांभाळतात. परिणामी, या निरीक्षकांचे लागेबांधे तयार झाल्याने गेल्या काही वर्षात शहरात अतिक्रमणे वाढली असून प्रशासकांच्या कारवाईच्या आदेशानंतर ही वाढलेली अतिक्रमण किती प्रचंड आहेत, हे महापालिकेनेच केलेल्या कारवाईच्या आकडेवारीतून समोर येत आहे.
काढलेले अतिक्रमण…
1 लाख 37 हजार चौरसफूट बांधकाम
18 स्टॉल
89 हातगाडी
358 पथारी/ काउंटर
659 शेड आणि झोपड्या
44 सिलिंडर