मांजरी (विवेकानंद काटमोरे) -महामेट्रोकडून वनाज ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या इंटरचेंज स्थानकापर्यंत मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. यानुसार गरवारे महाविद्यालय ते इंटरचेंज स्टेशनपर्यंत मेट्रोची चाचणीही घेण्यात आली, त्यामुळे लवकरच वनाज ते शिवाजीनगरपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे शिवाजीनगरपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण झाल्याने आता हडपसरसाठीच्या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव असल्याने हे काम कधी सुरू होणार याकडे हडपसर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर पहिल्या टप्प्यातील काम झाल्यानंतर मेट्रो हडपसरपर्यंत आणि त्यापुढे लोणी काळभोरपर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) एप्रिल 2022 मध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. शहरासह वनाज, कोथरूड, सिंहगड रोड आदी भागात मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. अनेक ठिकाणी मेट्रोची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. त्यामुळे हडपसर मेट्रो मार्गाचे काम कधी सुरू होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे शहराची सार्वजनिक वाहूतक व्यवस्था मेट्रोमुळे भक्कम होणार आहे. यातून शहर तसचे उपनगरांतील वाहतूक कोंडी होण्यासही मदत होणार आहे. शहरालगतचा सर्वाधिक वाहतूक कोंडी होणार भाग म्हणून पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसरकडे पाहिले जाते. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मेट्रो हा सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.
वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय…
पुणे-सोलापूर मार्गावर हडपसर, मुंढवा, वानवडी, फातिमानगर, शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोलनाका, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर आणि उरुळी कांचन परिसराचे नागरिकण मोठ्या वेगाने होत आहे. या परिसरातून दररोज हजारो नागरिक शहराच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करतात. त्यामुळे पुणे-सोलापूर महामर्गावर मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर हिंजवडी ते शिवाजीनगरला येणारा मेट्रोचा मार्ग शिवाजीनगर ते लोणी काळभोरपर्यंत आल्यास पुणे-सोलापूर मार्गावरील टप्यात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.