पुणे – एनडीए चौकातील (चांदणी चौक) लोहिया आयटी पार्क समोरील चौक अपघाताचा ‘ब्लॅक स्पाॅट’ ठरत आहे. गुरूवारी (दि. 13) दुपारी एसटी कार्गो बसचा झालेला भिषण अपघात येथील त्रुटी उघड करणारा आहे. महिन्याभरातील हा दुसरा भिषण अपघात आहे. त्यामुळे येथील अपघाताची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे.
मुंबई, मुळशी आणि बावधन येथून कोथरूडकडे जाणारी सर्व वाहने रूंद आणि तीव्र उताराच्या रस्त्याने लोहिया आयटी पार्क येथून पुढे जातात. याचठिकाणी वेदभवन, एनडीकडून अन्य मार्गावरील वाहने क्राॅसिंग होतात. तसेच, वाहतूक नियोजना अभावी याठिकाणी दररोज किरकोळ अपघात होत आहेत.
दि. 4 मे या दिवशी पीएमपी बसचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. त्यानंतर दोन ते तीन अपघातामध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी किरकोळ जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या. तर,
गुरूवारी एसटी बस, सिमेंट मिक्सर आणि दुचाकीमध्ये झालेला अपघातात दोन ते तीन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या त्यामुळे हा रस्ता अपघाताचा ब्लॅक स्पाॅट बनला आहे.
…तोच ठरतो अपघाताचा स्पाॅट
एनडीए चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच लोहिया आयटी पार्क येथून कोथरूडकडे जाणारा रस्ता रूंद करणे आणि तीव्र उतार काढून टाकणे हा येथील कामाचा मुख्य उद्देश होता. यासाठी राजकारण्यांनी मोठा अट्टाहास करून एनडीए चौकाचा विकास झाला.
मात्र, तीव्र उतार केवळ ५० टक्केच कमी झाला आणि अरूंद असलेला रस्ता रूंद झाला (एकपदरी असलेला रस्ता पाच पदरी झाला) आणि वाहनांचा वेग सुसाट झाला. परिणामी, अपघात वाढले त्यामुळे ज्यासाठी केला अट्टाहास, तोच रस्ता ठरतो अपघाताचा स्पाॅट असे म्हणण्याची वेळ आली आहे.
वाहतुकीचा बोजवारा…
वेदभवन येथील नवीन अंडरपास सुरू झाल्यानंतर कोणत्या वाहनांनी कोणत्या अंडरपासमधून ये-जा करायची याचा उल्लेख नाही. त्यावर तोडगा म्हणून थेट दोन अंडरपासमध्ये पक्के दुभाजक बांधण्यात आले आहेत. मात्र, अंडरपासमधून पुढे गेल्यावर पुन्हा क्राॅसिंगचा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. दरम्यान, सिमेंटचे दुभाजक उभारल्यामुळे वाहतूक विस्कळीत होईल. तसेच, येथील तीव्र उतार कमी करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी एनएचएआयकडे केली आहे.
महत्वाचे…
– रस्ता मोठा झाल्याने वाहनांचा वेग वाढला
– तीव्र उतार, दोन ते तीन ठिकाणाहून वाहेने एकाच चौकात
– सहा लेनमधून येणारा रस्ता तीन लेनमध्ये येतो
– चौकात वाहने क्राॅसिंग होतात
– चौकात रिक्षा, खासगी वाहने पार्किग केली जातात
– चौकातील रस्ता तीव्र उतारानंतर थोडाशा वळणाचा