प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 23 -निकाल लागला तरी वेळेत गुणपत्रिका मिळत नाही, पदवी प्रमाणपत्रसाठी अर्ज केला; पण प्रमाणपत्र वेळेत प्राप्त होत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या वारंवार तक्रारी असतात. आता मात्र विद्यार्थ्यांना वेळेत गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र मिळणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र छापण्याची अत्याधुनिक मशीन कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे एका दिवसात चाळीस हजार प्रिंट घेणे शक्य होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पुणे, नगर आणि नाशिक येथील जवळपास 650 महाविद्यालयांशी संलग्न असून, साधारणतः आठ लाख विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून गुणपत्रिका, त्याबरोबरच पदवी प्रमाणपत्र दिले जाते. यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठाने हे मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. यापूर्वीच्या मशीनमध्ये एका वेळी केवळ पाचशे पेपर लोड केले जात होते. मात्र यामध्ये एका वेळी आठ हजार पेपर लोड करता येतात. तसेच यामध्ये प्रिंटिंगची गुणवत्ता देखील वाढणार आहे. तसेच “इमेज प्रोसेसिंग’ जलद होणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील प्रिंटिंग युनिटमध्ये ही मशीन कार्यान्वित करण्यात आले. त्याचे उद्घाटन कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, संतोष ढोरे, डॉ. महेश आबाळे, डॉ. सुधाकर जाधवर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची छपाई अधिक जलद होण्याच्या दृष्टिकोनातून या प्रिंटिंग मशीनची खरेदी करण्यात आली आहे. परीक्षा विभाग अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे.
-डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ