पुणे-परदेशांतून आलेल्या प्रवाशांचे ट्रेसिंग सुरू आहे. त्यात 3,200 पैकी सध्या सुमारे 2,200 जण सापडले आहेत. त्यातील सुमारे दोन हजार जणांची आरटी-पीसीआर टेस्ट झाली आहे. त्यात दोघांना “ओमायक्रॉन’ची बाधा झाल्याचे यापूर्वीच निष्पन्न झाले आहे.
परदेशांतून आलेल्या 750 जणांची विमानतळावरच टेस्ट करण्यात आली असून, 1,200 जणांचे घरी आल्यानंतर महापालिकेने त्यांना शोधून त्यांची टेस्ट केली आहे. दरम्यान, पुणे, मुंबई आणि नागपूर विमानतळांवर परदेशांतून नागरिक येतात. ज्या देशांत ओमायक्रॉन रुग्ण आढळलेले आहेत, अशा देशांतून या तीनही विमानतळांवर दि. 1 डिसेंबरपासून आतापर्यंत 11 हजार 751 प्रवासी पुण्यात आले. तर, इतर जोखमीचे नसलेल्या देशांतून 65 हजार 779 प्रवासी आले आहेत, असे महापालिका आरोग्य विभागाने सांगितले.
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले 107 नमुने
जोखमीच्या देशांतून आलेल्यापैकी 22 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, इतर देशातून पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या 8 आहे. क्षेत्रीय सर्वेक्षणातून 77 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून सर्व मिळून 107 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. यापैकी आतापर्यंत 20 रुग्णांचे नमुने ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 20 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.