अल्पवयीन विद्यार्थिनीवरबलात्कार प्रकरणत 15 वर्षे सक्तमजुरी
पुणे – अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला 15 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी सुनावली. दंडाची रक्कम भरल्यास अपील कालावधी संपल्यानंतर पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
शिक्षक हा मुलांचे भविष्य घडवत असतो. मात्र, याने अल्पवयीन विद्यार्थिनीचे आयुष्य बिघडून टाकले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाच असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील ऍड. सुचित्रा नरोटे यांनी युक्तीवादात केली. त्यानुसार न्यायालयाने शिक्षा सुनावली.
गोपाळ किसनराव चव्हाण (वय 33) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. डिसेंबर 2017 ते मे 2018 या कालावधीत निगडी परिसरात हा प्रकार घडला. पिंपरी पोलिसात या प्रकरणात गुन्हा दाखल होता. चव्हाण हा पार्टनरशिपमध्ये खासगी कोचिंग क्लास चालवत होता. त्याच्या क्लासमध्ये शिकवणीसाठी येणाऱ्या पीडितेला त्याने लग्नाचे अमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्पेै ऍड. सुचित्रा नरोटे यांनी 8 साक्षीदार तपासले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्ष उत्कर्षा देशमुख यांनी तपास केला. हवालदार भोसले यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहकार्य केले.