पुणे – कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवार निवड, तसेच पक्षाची मतदारसंघातील स्थिती लक्षात घेण्यासाठी निवडणुकीपूर्वी केलेले सगळे सर्व्हे त्यावेळी निकालाने खोटे ठरले. महाविकास आघाडीने भाजपला बालेकिल्ल्यातच धक्का दिला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीसाठी सर्व्हे करूनच उमेदवार निश्चित केला जाणार आहे, असे सुतोवाच भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सोमवारी केले.
पुण्यातून कोणत्याही उमेदवारांची नावे अथवा अर्ज मागविण्यात आलेले नाहीत. उमेदवाराची निवड ही केंद्रीय समिती करेल. तसेच ही नावे राज्याची समिती निश्चित करून पुढे पाठवेल. त्यामुळे शहर पातळीवर उमेदवार ठरणार नाही. मात्र, पक्षाकडून उमेदवासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हे केले जातात. हीच कार्यपद्धती असल्याचेही घाटे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने दि. ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान राबविण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
भावी उमेदवारांची कोंडी
पुण्यात भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी शहरात मोठ-मोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. पक्षाने आपल्यालाच तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याचवेळी घाटे यांनी पुण्याचा उमेदवार संसदीय समितीच ठरविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उमेदवारांंच्या नावाबाबत प्रदेश समितीकडून अद्याप कोणतीही विचारणा झालेली नाही. अथवा नावेही मागविण्यात आलेली नाही. तशा सूचना आल्यास माहिती दिली जाईल. परंतु पुणे शहर लाेकसभा मतदारसंघाचा उमेदवार काेण असेल, याचा अंतिम निर्णय हा पक्षाची केंद्रीय संसदीय समितीच घेईल, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.