इंदापूर -भादलवाडी येथील बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीच्या माथाडी कामगारांच्या न्याय मागण्यासाठी व स्थानिक नोकर भरती आणि कंपनीतील अनागोंदी कारभाराविरोधात इंदापूर येथील प्रशासकीय भवनासमोर सुरू असलेल्या उपोषणाला खासदार सुळे यांनी भेट दिली. यावेळी कंपनी प्रशासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन खासदार सुळे यांनी उपोषणकर्त्यांना दिले.
11 नोव्हेंबर 2011 च्या सहायक कामगार आयुक्त व माथाडी कामगार संघटनेच्या आदेशानुसार मे. बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्टस लि. भादलवाडी या कंपनीमध्ये माथाडी नोंदीमध्ये असलेले 9 कामगार प्रतीक्षा यादीमध्ये होते. त्या प्रतीक्षा यादीमधील कामगार दत्तात्रय आप्पा सूळ यांना आपल्या माथाडी मंडळाच्या आदेशानुसार कामावर रुजू करून घेतलेले आहे. त्याच धर्तीवर प्रतीक्षा यादीत राहिलेल्या 7 कामगारांना सुद्धा माथाडी काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखिल भारतीयमराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली दशरथ बंडगर, संदिप पडळकर, राजेंद्र पडळकर, सचिन सुतार, राजेंद्र रुपनवर हे पाच कामगार 24 जानेवारीपासून इंदापूर येथील प्रशासकीय भवनासमोर उपोषणाला बसले आहेत.