पुणे – वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तडीपार गुंडाने राडा घालत दोघांवर जीवघेणा हल्ला केला. दोघांच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडण्यात आल्या. यानंतर जखमीचीच दुचाकी घेऊन आरोपींनी पळ काढला. यानिमित्ताने पुन्हा एकदा वारजे परिसरातील रात्री उशीरापर्यंत सुरु असणारे बार आणि जुगार अड्डे यांचा विषय चर्चेत आला आहे. ही घटना चांदणी बार हॉटेलच्या आवारात घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अक्षय भरत झेंडे (२८, रा.कर्वेनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरुन सुरज राजु जाधव(२८, रा.कर्वेनगर) आणि अक्षय सावंत कर्वेनगर यांना अटक करण्यात आली आहे. तर सोन्या पिंजारेवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील अक्षय सावंत हा तडीपार होता, तो तडीपारीचा भंग करुन परिसरात वावरत होता. तर सोन्या पिंजारेही सराईत गुन्हेगार आहे. अक्षयचा बेकायदा दारु विक्रीचा व्यवसाय आहे, याप्रकरणी त्याच्यासह सोन्यावरही गुन्हे दाखल आहेत. तर फिर्यादी अक्षयची पानटपरी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी अक्षयचा मित्र स्वप्निल मारणे हा आरोपी सुरजचा मित्र आहे. स्वप्निल , सुरज आणि अक्षय असे तिघेही कर्वेनगर येथील चांदणी बारमध्ये दारु पित बसले होते. यानंतर दारु पिताना तिन्ही आरोपींनी स्वप्निल बरोबर भांडणे काढली. वाद वाढू लागल्यावर स्वप्निलने अक्षयला फोन करुन घेण्यास बोलवले. अक्षय बाहेर आल्यावर स्वप्निल त्याच्यासोबत जाऊ लागला.
यावेळी आरोपींना त्याचा राग आला. त्यानी अक्षयला ‘तु दादा झालास काय? त्याला सोडवायला आलास,’ असे म्हणून अक्षय आणि स्वप्निलच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन गंभीर जखमी केले. बार बाहेर झालेल्या भांडणामुळे रात्रीच्या वेळी परिसरात गडबड उडाली होती. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.