पुणे – सराईत गुन्हेगार शरद हिरामण मोहोळ खूनप्रकरणी गुन्हे शाखेने अवघ्या ८ तासांत आरोपींना जेरबंद केले. यामध्ये दोन वकिलांचा समावेश आहे. तर, गुन्ह्यातील मुख्य आरोपी मामा-भाचे आहेत. साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (२०, रा. सुतारदरा कोथरुड), नामदेव कानगुडे (३५ रा. भुगाव ता. मुळशी, अमित उर्फ अमर कानगुडे (२४, रा. मित्रमंडळ चौक, पर्वती) चंद्रकांत शाहु शेळके (२२ रा. जनता वसाहत), विनायक गव्हाणकर ( २०, रा. पौड), विठ्ठल गांदले (३४, रा. सुतारदरा, कोथरुड ) यांच्यासह दोन वकिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील नामदेव कानगुडे हा मामा तर साहील पाळेकर भाचा आहे.
गुंड शरद हिरामण मोहोळ ( ४०, रा. सुतारदरा ,कोथरुड) याच्यावर शुक्रवारी सुतारदरा परिसरात त्याचा साथीदार मुन्ना उर्फ साहील पोळेकर याने गोळीबार करुन खून केला होता. याप्रकरणी कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्याची संवेदनशीलता ओळखून पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे व पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांना तत्काळ आरोपींचा शोध घेत कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी गुन्हे शाखेची ९ पथके तयार करुन आरोपीच्या शोधासाठी पुणे शहर परिसर, मुळशी, सातारा, पुणे ग्रामीण व कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली होती. दरम्यान, आरोपी चारचाकी वाहनातून सातारा मार्गाकडे पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सातारा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून नाकाबंदी लावण्यात आली.
दरम्यान, पोलिसांना सातारा मार्गावर किकवी गावाजवळ संशयीत चारचाकी वाहन दिसले. त्याचवेळी आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले ३ गावठी पिस्तूल, ३ मॅगझिन, ५ जिवंत काडतुसे ८ मोबाइल आणि रोकड असा २२ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुन्या वादातून त्यांनी शरद मोहोळ याचा खून केल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त सुनील तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, शब्बीर सय्यद, श्रीहरी बहीरट, महेश बोलकोटगी, सोगनाथ जाधव, उल्हास कदम, सुनिल थोपटे, क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, राहुल पवार, राजेंद्र पाटोळे.
पोलीस अंमलदार चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाणे, अमोल आव्हाड, राजेंद्र लांडगे, रवींद्र फुलपगारे, दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, विजय कांबळे, प्रवीण ढमाल, विजय कांबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, शशिकांत दरेकर, ज्ञानेश्वर चित्ते, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, साई कारके, ऋषिकेश ताकवणे, नितीन मुंडे यांनी केली.