पुणे- महापालिकेची अंतिीम प्रभागरचना जाहीर करताना या प्रभागरचनेचे नकाशे शहरातील नागरिकांसाठी फलकावर लावण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिकेस देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रभागरचना जाहीर होऊन तीन ते चार दिवस झाले तरी अद्याप पालिकेने मुख्य इमारतीसह कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयांत हे नकाशे नागरिकांसाठी फलकांवर जाहीर केलेले नाहीत. यामुळे, पालिकेकडून सरळसरळ आयोगाच्या आदेशालाच हरताळ फासल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे प्रारूप प्रभागरचनेचे नकाशे पालिकेने फलकावर तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांत लावले होते. त्यामुळे आता अंतिम नकाशे लावण्यात अडचण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 10 मे रोजी प्रभागरचना अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर 17 मेपर्यंत हे नकाशे तसेच अधिसूचना जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पालिकेने घाई गडबड करत 13 मे रोजी मध्यरात्रीच ही प्रभागरचना जाहीर केली, तीसुद्धा अर्धवट स्वरूपात होती. यावेळी केवळ संपूर्ण शहराचा एकच नकाशा पालिकेने जाहीर केला. त्यानंतर चार दिवसांनी प्रभागाचे स्वतंत्र नकाशे आणि त्यानंतर आरक्षणाची परिशिष्ट जाहीर केली. मात्र, आयोगाने ही प्रभागरचना फलकावरही जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पालिकेने नागरिकांच्या माहितीसाठी कोणत्याही क्षेत्रीय
कार्यालय स्तरावर अथवा पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये कुठेही हे नकाशे नागरिकांसाठी जाहीर केलेले नाहीत.