सुनील राऊत
पुणे – करोना बाधितांच्या उपचारांसाठी महापालिकेने खरेदी केलेले साहित्य प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून घेतलेल्या या साहित्यांच्या विल्हेवाटीसाठी पुन्हा तेवढाच खर्च करावा लागणार आहे. तर, हे साहित्य विकायचे झाल्यास ते रुग्णांच्या उपचारांसाठी वापरलेले असल्याने त्याच्या खरेदीस कोणीही पुढे येत नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे.
करोना बाधितांवर उपचार करण्यासाठी पालिकेने ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारली, तर अनेक रुग्णालयांत तात्पुरत्या खाटांची संख्या वाढवली. वाढते बाधित लक्षात घेऊन काही ठिकाणी क्वारंटाइन सेंटर्सही तयार केली. यादरम्यान जवळपास 25 हजार बेड्सची सुविधा तयार केली गेली. यासाठी जवळपास तेवढ्याच गाद्या, उशा, बेडशिट्सही प्रशासनाने खरेदी केल्या. इतर रुग्णांना सेवा देण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यही खरेदी करून काही सेंटर सुरू केले, तर काही सेंटर तयार करून ठेवले. म्हणजे गरज भासली तर ते लगेच सुरू करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली. पण, आता करोनाची साथ ओसरत आहे.
सध्या फक्त 2,100 सक्रिय बाधित असून, त्यातील केवळ 500 रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर फक्त 45 ते 50 रुग्ण पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. पालिकेचे सध्या एकच कोविड केअर सेंटर सुरू आहे.
प्रतिकिलो 60 रुपये खर्च
करोना बाधितांच्या उपचारांनंतर निर्माण झालेला कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट बंधनकारक आहे, असे केंद्र शासनाचे आदेश आहेत. मात्र, गादीच्या विल्हेवाटीसाठी प्रतिकिलो 60 रुपये खर्च येणार असून गाद्यांचे वजन सरासरी 5 ते 6 किलो आहे. तर, उशा आणि बेडशिट्सची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पालिकेस या कचऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागणार आहे. हे साहित्य घेण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. त्यामुळे आता त्याच्या विल्हेवाटीचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.
करोना बाधितांच्या उपचारांसाठी घेतलेल्या साहित्यांचे माहिती संकलन सुरू आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे फेरवापराचे साहित्य सॅनिटाइझ करून वापरले जाईल, पण इतर साहित्य विल्हेवाट लावली जाईल.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा