दैनिक प्रभातमधील ते दिवस – “कुसुमाग्रज”

“दै. प्रभात’च्या सुरुवातीच्या काळातच (वर्ष 1938 नंतर) सुमारे तीन ते चार वर्षे कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) रात्रपाळीचे संपादक म्हणून कार्यरत होते. त्याविषयीचा एक लेख त्यांनी वर्ष 1966 मध्ये लिहिला होता. नंतर वर्ष 1970 मध्ये त्यांच्या “विरामचिन्हे’ या ललितलेखसंग्रहात हा लेख “पुणे मुक्‍काम’ या नावाने प्रसिद्ध झाला. या लेखाच्या प्रकाशनास यावर्षी म्हणजे 2020 मध्ये 50 वर्षे पूर्ण होत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद, भारतीय साहित्यातील सर्वोच्च “ज्ञानपीठ पुरस्कार’ तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान “पद्मभूषण’ सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार आणि असंख्य पुरस्कारांसह दिगंत कीर्ती मिळवलेल्या कुसुमाग्रजांच्या या आठवणी तुम्हा-आम्हा सर्वांसाठीच मोलाच्या आहेत, हे नक्‍की.

पुणे शहरात मी सड्या स्वारीने, पत्रसृष्टीत काही कार्यक्रम गाजवावा आणि चरितार्थही साधावा अशा भावनेने प्रेरित होऊन प्रवेश केला. प्रथमत: दार ठोठावले ते “लोकशक्‍ती’चे. संपादकीय खात्यात तेथे काही उलाढाली चालू आहेत, असे ऐकले. पां. वा. गाडगीळ यांची पहिली भेट तेथेच झाली. शंकरराव देव मुख्य संपादक होते. पण कामाची जबाबदारी बव्हंशी पां. वा. यांच्यावरच होती. पत्राची परिस्थिती एकूण हलाखीचीच होती. संपादकीय खात्यात नव्हे, तर पत्राच्या आयुष्यात काही घालमेल चालू होती. कचेरीत सारी माणसे इकडून तिकडे फिरत होती. एकमेकांच्या कानाला लागत होती. पुन्हा कोठे तरी जात होती.

लग्नाच्या गोंधळात अनोळखी माणसालाही कोणी तरी पाटावर बसवावे, त्याप्रमाणे मला कोणी तरी कामावर रूजू करून घेतले. प्रायोगिक आणि उच्च दर्जाच्या चित्रपटाप्रमाणे ही नोकरी जेमतेम एक आठवडाभर चालली. “लोकशक्‍ती’चे स्थलांतर आणि मला वाटते हस्तांतरही झाले. या गडबडीत काही माणसे बाहेर उडाली. मी त्यात होतो. मला कोणी कमी केले, की मी आपण होऊन निघालो, हे आता लक्षात नाही. सात आठ दिवसात काम काहीच नव्हते. फक्‍त बसण्यासाठी जागा शोधीत होतो एवढेच आठवते.
त्यानंतर प्रभात…

कोठेतरी शोध घ्यायचा म्हणून प्रभातकडे गेलो. “सकाळ’कडे जाण्याची इच्छा नव्हती. आणि “केसरी’च्या किल्ल्‌यात जाण्याची छाती नव्हती. गायकवाड वाड्यातील पगडीवाल्यांची आणि फेटेवाल्यांची गंभीर रहदारी पाहिल्यावर, नोकरीसाठी तर राहोच, पण अंक खरेदी करण्यासाठीही आपल्यासारख्या बिगर टोपीवाल्याला कोणी आत सोडणार नाही, याची खात्री होती. शिवाय सहसंपादकाला मते नसतात, हे खरे असले तरी “आपला फार कोंडमारा होणार नाही’, असे पत्र असावे असे वाटत होते. “प्रभात’चे राजकारण फारसे जुळत नसले तरी प्रवाही होते. पत्र त्या मानाने लहान असले तरी रोज अंक निघत होता आणि चांगला खपतही होता. लहानपणही सोयीचेच होते.

“प्रभात’ची कचेरी नातूंच्या बागेत होती. चौकशी करीत दुपारच्या वेळ कचेरीत जाऊन एका टेबलासमोर उभा राहिलो. समोरचे गृहस्थ संपादकापेक्षा कापड दुकानाच्या मालकासारखे दिसले. जवळच्या खुंटीवर लांबलचक कोट आणि वर फेटा टांगून ठेवला होता. चेहऱ्यावर मिशीचे प्राबल्य होते आणि चष्मा काढल्यावर डोळे हत्तीसारखे बारीक होत होते. आपल्या धारदार पण फटकळ लेखणीमुळे अनेकांच्या रोषाला पात्र झालेले, सत्यशोधक चळवळीत हत्यारी पत्रकार म्हणून नावाजलेले वालचंद कोठारी ते हेच, हे लक्षात आले.

मी माझा मनोदय सांगितला आणि माझीच वाट पाहत असल्याप्रमाणे कोठारींनी तो ताबडतोब मंजूरही केला. पगार कमी होता. परंतु त्या काळाच्या मानाने फारच कमी होता, असे नाही. खोली घेऊन दोन वेळा खाणावळीत जेवणे त्यात अशक्‍य नव्हते.

टिळक रस्त्यावर मी एक खोली घेतली. (त्या सुवर्णयुगात पन्नास जागा पाहून त्यातील एक निवडता येत असे.) आणि “प्रभात’ मधील काम मनोभावे करू लागलो. थोड्याच दिवसात “प्रभात’चेही स्थलांतर झाले. नातूंच्या बागेतून सदाशिव पेठेतील पेरूच्या गेटाजवळ स्वत:च्या छापखान्यात तो आला. ही घटना वरच्या दिशेने आणि म्हणूनच सर्वांना आनंददायक होती.

“प्रभात’मध्ये तीन-साडेतीन वर्षे होतो. तेथील वातावरण माझ्या वृत्तींना इतके चपलख बसले की, काम करणे हा एक आनंदाचा भाग झाला. हवेत “सकाळ’चे सरकारीपण नव्हते अथवा “लोकशक्‍ती’ मधील देशभक्‍तीचा अविर्भाव नव्हता. साराच कारभार मोकळाचाकळा, दिलखुलास आणि घरगुती स्वरूपाचा होता. बाह्यत: कठोर वाटणारे कोठारींचे व्यक्‍तित्व अतिशय चौरस, रंगीन आणि प्रसन्न असे होते. “बुद्धिमवा’ म्हणजे तलवारीचे पाते-धारदार आणि वार करण्यात मौज मानणारे. व्यवहारदक्ष इतके की, रद्दी विकतानाही काट्याजवळ स्वत: उभे राहत. वर या व्यवहारबुद्धीला चहुकडे विनोदाची झालर होती.

व्यापार, वकिली, राजकारण, पुस्तक प्रकाशन इत्यादी अनेक क्षेत्रातील नानाविध अनुभव गाठीला होते आणि गप्पा मारण्याची मनसोक्‍त हौस होती. आमचे सहसंपादकीय टेबल त्यांच्या टेबलाजवळ असे. काम करता करता ते एकदम थांबत आणि काही तरी चर्चा करू लागत किंवा आपल्या पूर्वायुष्यातील एखादा गमतीचा अनुभव आपल्या शैलीने सांगू लागत. आपल्या मालकपणाचा धस कोणाच्या स्वाभिमानाला लागू नये, याविषयी ते फार दक्ष असायचे. माझ्या कामावरती कोठारी संतुष्ट असत. मराठीचे लेखन अविकृत आणि शुद्ध व्हायला हवे, असा त्यांचा आग्रह असे. सहसंपादकाच्या सर्व कॉप्या त्यांच्या टेबलवर जात.

प्रत्येक कॉपी ते बारकाईने वाचीत. लेखन चांगले वाटले की, शाबासकी देत आणि वाईट दिसले की चवताळून जात. रात्रपाळीला मात्र एकच सहसंपादक असायचा आणि सगळ्या कामाची जबाबदारी त्यांच्यावरच असायची. दोन महिन्यानंतर मीही नियमितपणे रात्रपाळी करायला लागलो.

रात्रपाळी हाही एक अनुभव होता. नाटक, सिनेमाच्या रात्रीच्या कामाची सवय होती. पण तेथील रात्र दिव्यांनी नुसती “पंक्‍चरलेली’ नव्हे; तर पूर्णत: तोडलेली, फाडलेली असे. शिवाय नानाविध आवाजांची गजबज आणि धावपळ. येथे दोन खोल्यांच्या प्रशस्त कचेरीत सहसंपादक एक दिवा पेटवून एकटाच बसायचा. नऊ वाजता यायचे आणि शेवटचे पान प्रूफ पाहून पहाटे तीन वाजता परत घरी यायचे. छापखाना जरा बाजूला होता. अधूनमधून कंपोझिटर येत असले तरी सामान्यत: सारा एकाकी कारभार. हा एकांत केव्हा डोक्‍यावर थिजायला लागला म्हणजे कचेरीच्या भिंती मागे सरकत आणि खोलीचे क्षेत्रफळ वाढवीत.

तावदानातून बाहेरचा काळोख काचेला तोंड लावून आत पाहायचा. केव्हा बाहेर येण्यासाठी नि:शब्द खुणा करणारे अंधुक चांदणे तर केव्हा आत्ममग्न पिसाटाप्रमाणे डांबरी रस्त्यावर आदळणारा पाऊस, आतमध्ये मेज, कोरे कागद, रॉयटरच्या तारांची पाकिटे, आवाज चौपट मोठा करून टिकटिकणारे घड्याळ, प्रूफांच्या लांबट गवताळ कागदाचे गुंडाळे.. आणि केव्हा हिटलर- मुसोलिनीच्या भाषणावर उड्या मारणारी मांजराची मखमली पिलेही. सुखाने निद्रिस्त असलेल्या सभोवतालच्या दुनियेला सकाळी अशांत आणि क्षुब्ध करणाऱ्या बातम्यांची बंडले समोर येऊन पडत. आपण जगाच्या पुढे आहोत किंबहुना देश -परदेशात धडाडणाऱ्या जीवनाच्या नाडीवर आपला हात आहे. (मिळकत कमी असली तरी) असा दिमाख उगाचच मनामध्ये फुलून येई. पत्रकार आघाडीवर असला तरी कवी जागृत होताच. किंबहुना जोमात होता.

अंधारात गुरफटलेला तो एकांत कधी कधी त्याला हाक मारायचा. प्रसंग निकराचा आला तर रॉयटर- ए.पी.ला बाजूला सारून मी कविता लिहितही बसे. “विशाखे’तील काही कविता तेथे लिहिल्या गेल्या किंवा उगवल्या तरी. “क्रांतीचा जयजयकार’ ही त्यातील एक.

“प्रभात’ मधील कामात इतका मन:पूर्वक रूतलो होतो की, सिनेमा-नाटक तर मनातून पार मावळलेच. पण साहित्यासंबंधीचा रस पुष्कळ कमी झाला. कविता लिहायच्या आणि ज्योत्स्नेकडे पाठवायच्या, यापलीकडे साहित्याशी काही संबंध राहिला नव्हता. त्यामुळे पुण्यातील वाङ्‌मयीन विश्‍व अजिबात अपरिचित राहिले, त्या वाटेला कधी फिरकलोच नाही. फक्‍त लॉ कॉलेजच्या दिशेने कधी फिरायला गेलो म्हणजे ‘निवांत’कडे भक्‍तिभावाने पाहत असे. दोन-तीन वेळा आत जाऊन माधवरावांना भेटलोही होतो.

मी काव्यलेखनाच्या भानगडीत आहे, हे कोठारींना माहूत नव्हते आणि काव्याबाबत त्यांना काही कौतुकही नव्हते. पण माझ्या गद्य आणि वृत्तपत्रीय लेखनाला अधिक वाव मिळावा म्हणून एक साप्ताहिक काढण्याची त्यांची योजना होती. “शलाका’ या नावाने नमुना अंक आम्ही काढला. पण काही अडचणींमुळे ती कल्पना सोडून द्यावी लागली. ती अंमलात आली असती तर मी कदाचित “पुणेकर’ झालो असतो. पण योग नव्हता.

एक दिवस अचानक खांडेकरांचे पत्र आले. मुंबईला दौंडकर एक नवीन साप्ताहिक काढणार होते. त्यांना सहसंपादकाची जरुरी होती आणि खांडेकरांनी माझे नाव सुचविले होते. कामात संपूर्ण स्वातंत्र्य होते आणि पगारही बरा होता. दैनिकाच्या रगाड्यात स्वत:ला गाडून न घेता, मी या साप्ताहिकाची नोकरी स्वीकारावी, असा खांडेकरांनी आग्रह केला होता. “दैनिकाचा रगाडा’ मला मुळीच जाणवत नव्हता. “प्रभात’च्या कार्यालयात जाताना आपण काही बोजा उचलायला जात आहोत, असे एक दिवसही कधी वाटले नाही. प्रत्येक दिवस उत्साहाने उगवत होता आणि तरीसुद्धा मुंबईला जायचे मी ठरवले. पराभवच्या भूमीवर विजय मिळवावा, असे वाटले असेल. आपल्या मनासारखे एक साप्ताहिक काढावे अशी उत्सुकता असेल किंवा खांडेकरांच्या शब्दाचा प्रभाव असेल, पण मी हा निर्णय केला. कोठारींनी माझे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला. पण माझा बेत बदलावा असे मला वाटेना. एक दिवस “प्रभात’च्या कचेरीतून कष्टी मनाने निरोप घेऊन बाहेर पडलो. 

त्या दिवशी संध्याकाळी मी आवरा-आवर करीत बसलो असता दारावर टकटक झाली. दरवाजा उघडला, तो “प्रभात’चे सारे कंपोझिन्ग खाते समोर उभे. एकेकजण आत येऊन बसले सारी खोली भरून गेली. थोड्या वेळच्या नि:शब्दतेनंतर फोरमनने पिशवीतून हार-नारळ इ. साहित्य बाहेर काढले. असा निरोप देऊन आणि काही बातचीत करून ते जरा वेळाने निघून गेले. त्यांच्या वाटेकडे पाहताना छातीत कसकसून आले. तो एक हार माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे.

(पूर्वप्रसिद्धी-“विरामचिन्हे-1970)

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.