पुणे -राज्यात ऑनलाइन भाडेकराराच्या 25 हजार दस्तांची नोंदणी प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. भाडेकरार दस्तांची नोंदणी न झाल्याने नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात देशभरातून येणारा नोकरदार वर्ग, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येणारे उमेदवार यांची वाढती संख्या त्यामुळे भाड्याने घर घेऊन राहणे सर्वजण पसंत करतात. शहरात लिव्ह अँड लायसन्स तत्वावर घर भाड्याने घेवून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाडे करारासाठी सक्षम भाडे नियंत्रण कायदा असल्याने ऑनलाइन भाडेकरार करून घेण्याचा कल वाढला आहे.
याविषयी माहिती देताना असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हाडरचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी सांगितले की, जुनी पेन्शन बाबत कर्मचारी यांचे आंदोलन, सर्व्हर मधील झालेला तांत्रिक बिघाड, रेडी रेकनर वाढीच्या शक्यतेने मार्च अखेर दस्त नोंदणीस गर्दीमुळे ऑनलाइन भाडेकराराचे दस्त नोंदवणे दुय्यम निबंधकांना शक्य नव्हते. यामुळे प्रलंबित दस्तांची संख्या वाढत गेली. आजपर्यंत राज्यात 25 हजार दस्त प्रलंबित आहेत. याबाबतचे निवेदन नोंदणी उपमहानिरिक्षक यांना देण्यात आले आहे. यावेळी मंगेश पाटील, योगेश पनपालीया, अँड वैशाली शिंगवी, हरिदास मेरुकर, ऋषिकेश जंगम, रुपेश जाधव उपस्थित होते.
उर्वरित दस्त नोंदणी आठवडाभरात…
राज्यात ऑनलाईन भाडेकराराचे 35 हजार दस्त प्रलंबित होते. मागील दोन दिवसात 10 हजार दस्तांची नोंदणी झाली असून उर्वरित 25 हजार भाडेकराराची नोंदणी आठ दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन नोंदणी विभागाने दिले आहे.
अशी असते ऑनलाइन प्रक्रिया
पुणे व पिंपरी चिंचवडमधील 1 ते 27 दुय्यम निबंधकांमार्फत तसेच फक्त भाडेकरारासाठी असलेल्या हवेली क्रमांक 28 मधील दुय्यम निबंधक मार्फत अधिकृत सेवा पुरवठादार ऑनलाइन पद्धतीने जमा केलेले दस्त, भरलेले मुद्रांक शुल्क व नोंदणी फी व इतर बाबतीत आवश्यक ती कागदपत्रे तपासून त्यावर दुय्यम निबंधक याचा हाताचा ठसा घेऊन कार्यालयाचा शिक्का, दस्त क्रमांक, दिनांक, ऑनलाइन पद्धतीने नोंदवून दस्त नोंदवितात.