पुणे – पुणे पुस्तक महोत्सवांतील दालनांमध्ये असलेली पुस्तके पाहणे, पुस्तकांची खरेदी, सांस्कृतिक कार्यक्रम, वैविध्यपूर्ण उपक्रमांना पुणेकरांनी तुडुंब गर्दीने प्रतिसाद दिला. त्यामुळे पुणेकरांचा रविवार खऱ्या अर्थाने प्रसन्नरित्या साजरा झाला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवात रविवारी लहान मुलांसाठी द मॅजिक ऑफ वर्ड्स हे स्टोरी टेलिंगचे सत्र, ओरिगामी कार्यशाळा, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचा सुट्टी आली, सुट्टी आली हा कार्यक्रम, यंग पिकासोज ही इलस्ट्रेशन्सची कार्यशाळा, टॅलेंट हंट, ऋचा लिमये यांचा अ सिम्बाॅयोसिस ऑफ वर्ल्ड लिटरेचर, सायंकाळी शक्तीदात्री – द लिबरेशन ऑफ सीता, अशी विविध सत्रे झाली. तर, तुकाराम दर्शन हे महानाट्य सादर झाले.
रविवारच्या सुटीचा योग साधून मोठ्या संख्येने पालक मुलांना घेऊन महोत्सवात दाखल झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेत, त्यांना प्रतिसाद दिला. तसेच स्टोरीटेलिंग, इलस्ट्रेशन्सची कार्यशाळा, टॅलेंट हंट अशा कार्यक्रमांमध्ये मुले उत्साहात सहभागी झाली. तसेच महोत्सवात असलेल्या विविध भारतीय भाषांतील पुस्तकांची दोनशेहून अधिक दालने फिरून पुस्तकांची खरेदीही आवर्जून करण्यात आली. या प्रदर्शनात धार्मिक, अध्यात्मिक साहित्याच्या पुस्तकांपासून ललित साहित्य, अनुवाद, स्पर्धा परीक्षा, शिक्षण, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पालक, मुले, युवा वर्ग या पुस्तकांमध्ये दिवसभर रमून गेले. त्यामुळे पुस्तक महोत्सवाला रविवारी प्रचंड गर्दी झाली होती.
कुमार विश्वास,विक्रम संपत वाचकांच्या भेटीला
पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आज सोमवारी (दि.१८) एकाच दिवशी पुणेकरांना प्रसिद्ध कवि कुमार विश्वास, लेखक विक्रम संपत आणि लल्लनटॉप फेम पत्रकार सौरभ द्विवेदी यांचे विचार ऐकता येणार आहे. हे तिन्ही कार्यक्रम विनामूल्य असल्याने, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.