पुणे -तरुणाईमध्ये जुन्या गाड्यांचे असलेले आकर्षण…. सेल्फीसाठी लागलेली चढाओढ… राइडसाठी सज्ज झालेले ज्येष्ठ नागरिक आणि रॅली दरम्यान नागरिकांनी केलेले उत्स्फुर्त स्वागत अशा उत्साहात विंटेज व क्लासिक कार्स रॅलीला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लब आणि रेस कोर्स टर्फ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विंटेज अँड क्लासिक कार्स, मोटारसायकल व स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे प्लॅग ऑफ आणि पारितोषिक वितरण अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले.
या रॅलीमध्ये रोल्स रॉईस, बेंटली, मर्सिडीज बेंझ, शेवरलेट, मॉरिस कन्वर्टिबल, ऑस्टिन, फोर्ड व इतर फॉरेन कार्स अशा अतिशय मौल्यवान जुन्या 70 ते 80 विंटेज व क्लासिक कार्स आणि सुमारे 30 ते 40 विंटेज स्कूटर्स व मोटारसायकली सहभागी झाल्या होत्या. रॅली रेसकोर्स टर्फ क्लब येथून सुरुवात होऊन पुन्हा टर्फ क्लब येथे समाप्त झाली.
पोलीस आयुक्तांनीही केले सारथ्य
1982 मधील मर्सिडीज बेंझ 300 टी डी ही सुभाष सणस यांच्याकडे संग्रहित असलेली पोलिसांची जुनी गाडी माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चालवत रॅलीचा आनंद घेतला. माझ्याकडे एकही गाडी नाही. मात्र, अशा जुन्या गाड्या पाहण्याचा आणि त्यांची माहिती घेण्याची आवड असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
नेते-अभिनेत्यांच्या गाड्या
या रॅलीमध्ये सुभाष सणस यांच्या मालकीची नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला, हॉलिवूड स्टार अल पचिनो यांची मर्सिडीज बेंझ, अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज, विनोद खन्ना यांची 2 डोअर सिल्व्हर कलर मर्सिडीज व इतर सेलिब्रिटीज यांच्या विंटेज कार्स तसेच “बॉबी’फेम राजदूत मोटारसायकल अशा वाहनांचा समावेश होता.