शहरात १०० ठिकाणी साजरा होणार पादचारी दिन
पुणे – रस्यावर चालणारे नागरिक म्हणजेच पादचारी हे रस्त्यावरील सर्वात महत्त्वाचे घटक समजले जातात. मात्र, संपूर्ण वर्षभर या घटकाच्या नावाखाली कोट्यवधीची उधळपट्टी करून या घटकाकडे सोयीस्कर दूर्लक्ष केले जाते. मात्र, महापालिकेकडून येत्या ११ डिसेंबर रोजी या दूर्लक्षित घटकाला एका दिवसाचा राजा केला जाणार आहे.
महापालिकेकडून शहरात येत्या ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जाणार असून या दिवशी गजबजलेला लक्ष्मी रस्ता वाॅकींग प्लाझा असणार आहे. तर शहरातील वेगवेगळया १०० चौकांमध्ये एकाच वेळी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतात रस्यावरील अपघातांमध्ये चालणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पादचारी सुरक्षा व अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी, तसेच पादचारी (ज्यात प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध, स्त्रिया तसेच अंध, अपंग,
विकलांग नागरिक) यांच्याबाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी दर वर्षी ११ डिसेंबर रोजी पादचारी दिवस साजरा केला जात असून महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम पुणे वाहतूक पोलीस, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना, पथारीवाले संघटना यांच्या सहकार्याने आयोजित केला जातो.
लक्ष्मी रस्त्यावर वाहनांना बंदी
पादचारी दिना निमित्ताने लक्ष्मी रस्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक हा भाग वाहन-विरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजावण्यात येणार आहे. या दिवशी सोमवार असल्याने सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत हा रस्ता वाहनांना वापरता येणार नाही. या दिवशी जास्तीत जास्त नागरिक लक्ष्मी रस्स्यावर यावेत, या करीता महामेट्रोमार्फत डेक्कन मेट्रो स्थानक व पुणे मनपा मेट्रो स्थानकापासून खास सायकलींचे आयोजन करण्यात येत आहे.
तसेच पी. एम.पी.एम.एलमार्फत ज्यादा बस सेवा पुरविण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी लक्ष्मी रस्ता “वॉकिंग प्लाझा” चा आनंद घेण्यासाठी चालतच यावे व वाहनधारकांनी पर्यायी रस्यांचा वापर करावा, असे आवाहन पुणे मनपाने केले आहे. या शिवाय, नागरिकांसाठी वेगवेगळे मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.