20 वर्षांची प्रतिक्षा संपली : दोन लाख नागरिकांना होणार फायदा
पुणे : गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर अखेर वानवडी येथील पुणे महापालिकेच्या नामदेव गेणूजी शिवरकर प्रसूती रुग्णालयात कार्यान्वित केलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये नुकतेच पहिले ऑपरेशन झाले. यावेळी दोन “नॉन-स्कॅल्पेल’ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
प्रलंबित नागरी काम, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि काम सुरू करण्यास नागरी संस्थेची इच्छा नसल्यामुळे रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर बंद होते. त्यामुळे या रूग्णालयात येणाऱ्या बहुतेक गर्भवती महिलांना जवळच्या कमांड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात यायचे किंवा तीन महिन्यांच्या गर्भवती महिलांना सोनवणे किंवा कमला नेहरू रुग्णालयात पाठवले जात होते. मात्र आता शिवरकर रुग्णालयातच ही सोय झाल्याने हडपसर परिसरातील सुमारे दोन लाख नागरिकांना याचा उपयोग होणार आहे.
गेल्या 20 वर्षांपासून प्रसूती रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर गळती, खिडक्या तुटणे आणि रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता यासारखे अनेक प्रश्न होते, त्यामुळे ते गेल्या कित्येक वर्षापासून बंदच होते. करोना काळात लसीकरणासाठी केंद्र सुरू केले होते. त्यानंतर येथील ऑपरेशन थिएटरचे काम करून हाती घेण्यात आल्याचे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले. याठिकाणी पहिल्यांदाच एका दिवशी दोन पुरुष नसब6ंदी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ज्या कधीच महापालिका रुग्णालयात होत नव्हत्या, असेही डॉ. जाधव यांनी नमूद केले.
ऑपरेशन थिएटर सुरू झाल्यामुळे आता ओपीडी व्यतिरिक्त, नियोजित सी-सेक्शन प्रसूती, उच्च जोखमीच्या गर्भधारणेची तपासणी, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू होऊ शकतात. याशिवाय काही चाचण्या, क्षयरोगाचे नमुने गोळा करणे देखील सुरू करणार आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि आशा वर्कर्स आणले आहेत आणि त्यांचे प्रशिक्षण देखील सुरू केले आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.