पुणे – शेतकऱ्यांची नावे सात-बारावर पोकळीस्त असल्याचा फायदा घेऊन नाममात्र किंमतीत जमीन खरेदी करून, दांपत्याला विकून 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात एकाला सत्र न्यायाधीश एस.बी. साळुंके यांनी जामीन मंजुर केला आहे.
महेश रामराव केंजळे (वय 42, रा. कोथरूड) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. सुधीर शहा आणि ऍड. राहुल भरेकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
मुळशी तालुक्यातील भुकूम गावच्या हद्दीत मार्च 2012 मध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी उद्योजक मिलिंद महाजन यांनी फिर्याद दिली आहे. जमिनीचे 85 लाख आणि इतर खर्च मिळून फिर्यादींची 96 लाखाची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पौड पोलिसांनी महेश याला अटक केली. त्याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. विक्री झाल्यापासून 2012 साली जमिनीचा ताबा फिर्यादींकडेच आहे. त्रास देण्याच्या दृष्टीने विलंबाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली.