आळंदी/शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील आळंदी जवळील सोळू गावात भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 8) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. घटनेत नेमके डीपी (विद्युत रोहित्र)चा की बंद असलेल्या कंपनीत स्फोट झाला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, स्फोट झाल्याने 100 मीटर अंतरातील परिसरात हादरला. मोठी हानी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ज्या ठिकाणी स्फोट झाला आहे, तिथे अल्युमिनियम प्लेट तयार करणारी कंपनी आहे. ती गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. मात्र, कंपनीतच भीषण स्फोट होऊन डीपीला आग लागली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, स्फोटानंतर परिसरातील तीन ते चार घरांना ही आग लागली यात 9 ते 10 दुचाकी, चारचाकी गाड्या, गवताच्या गंजी, गुरांचा चारा तसेच गुरांना देखील हानी झाली आहे.
क्षस्थानी कंपनी बरोबर परिसरातील घरांचे नुकसान झाले आहे. तर लागलेल्या आगीवर पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे चिखली, मोशी, भोसरी आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील पथकांनी नियंत्रण मिळवले त्यानंतर उशीरापर्यंत कुलिंग ऑपरेशन सुरू होते. जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात, पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालय आणि आळंदीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींना पुण्याच्या ससून रुग्णालयात या घटनेतील सहा जण दाखल करण्यात आले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण 80 ते 85 टक्के, दोन जण 60 ते 65 टक्के भाजले असल्याची माहिती ससून रुग्णालयाच्या अधिकार्यांनी दिली आहे.