पुणे – एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज विवेकानंद यांच्या जयंती निमीत्त झालेल्या राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी ऑन लाईन लॉटरीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. युवकांची पिढी सध्या ऑनलाईन लॉटरीच्या नादी लागून बरबाद होत आहे. अनेक जण कर्ज काढून हा जुगार खेळत आहेत.
त्यामुळे या युवकांची बरबादी वाचवायची असेल तर राज्य सरकारने तामिळनाडुच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ऑन लाईन लॉटरीवर बंदी घालावी या मागणीसाठी ही स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी नमूद केले. या स्वाक्षरी मोहीमेला नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय युवा दिन हा या मोहीमेसाठी अत्यंत समर्पक मुहुर्त आहे. त्यामुळे युवकांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक ठरले असल्याची मंडळाची भूमिका आहे. या स्वाक्षऱ्यांचे निवेदन राज्य सरकारला पाठवले जाणार आहे. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला.