pune news : दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या गणेश ऊर्फ गनी सखाराम राखपसारे (वय १९,रा. राखपसारे वस्ती, लोहगाव) याची मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हेगारी व विध्वंसक प्रतिबंधक कायद्याने (एमपीडीए) करण्यात आलेल्या स्थानबध्दतेच्या कारवाईतून मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिला.
पोलिसांनी मोक्काच्या खुप कारवाया केल्या आहेत. त्या न्यायालयात टिकत नसून, आरोपींना जामीन होत आहेत. त्यानंतर स्थानबध्देच्या कारवाई करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त यांनी ८० हून अधिक स्थानबध्दतेच्या कारवाया केल्या आहेत. त्याही टिकत नसल्याने पोलिसांना झटका मानला जात आहे.
यापूर्वीही स्थानबध्दतेच्या कारवायातून आरोपींची मुक्तता झालेली आहे. उच्च न्यायालयात गणेश याच्या वतीने अॅड. पुष्कर दुर्गे, अॅड. सुयश खोसे आणि अॅड. रुई दानावाला यांनी बाजू मांडली. पोलिसांनी १५ मे २०२३ रोजी कारवाई करून त्याला नागपूर कारागृहात स्थानबध्द केले होते. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयत धाव घेतली होती.
पोलीस आयुक्त यांनी इन कॅमेरा घेतलेली साक्ष ग्राह्य धरली आहे. दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. दोघांच्या जबाबातील पहिल्या सात ओळी जशाच्या तशा आहेत. त्यावरून दोघांचे जबाब संशयास्पद असल्याचे दिसून येते, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे अॅड. दुर्गे,अॅड. खोशे आणि अॅड. दानावाला यांनी केला.