पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खासगी महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतन योग्य पद्धतीने दिले जात नसल्याच्या तक्रारी असतात. त्या पार्श्वभूमीवर आता शुल्क नियामक प्राधिकरणाकडून (एफआरए) या महाविद्यालयांचा शुल्क निश्चिती प्रस्तावासह शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कागदपत्राची तपासणी करण्यात येणार आहे.
शैक्षणिक संस्थेकडून शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वेतनाबाबत अनियमितता समारे येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे दाबे दणाणले आहे. राज्यातील दोन हजारांहून अधिक अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, संगणकशास्त्र, वास्तुकला, विधी अशा विविध विद्याशाखांच्या महाविद्यालयांचे शुल्क निश्चित केले जाते.
मात्र, महाविद्यालये मनमानी शुल्क आकारत असल्याचे सातत्याने निदर्शनास आल्याने त्याला चाप लावण्यात येणार आहे. त्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी शुल्क निश्चितीसंदर्भात “एफआरए’ने काटेकोर नियमावली तयार केली आहे. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर, प्रवेशावेळी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अनामत शुल्क घेतात. या शुल्काचा तपशील सादर करावा लागणार आहे.
ही माहिती पडताळणार
“एफआरए’ने शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेतनाची कागदपत्रे मागवली आहेत. त्यात भविष्य निर्वाह निधी, फॉर्म 16, व्यवसाय कर (प्रोफेशनल टॅक्स), वेतन देयक अशा माहितीची पडताळणी यंत्रणेकडून केली जाणार आहे.