पुणे- महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्च 2020 ला पुण्यात सापडला. त्यानंतर या करोनाने उग्र रूप धारण केले. सुमारे 45 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेल्याने पहिल्या लाटेपासूनच संपूर्ण शहरात रेडझोन जाहीर झाले होते. यानंतर आता लसीकरण वेगाने झाले असून पुणेकरांनी तिसरी लाट पूर्णपणे थोपवल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्थकारणही सुरळीत झाले आहे. या सर्व बाबींवर टाकलेला हा प्रकाश.
महापालिका सहा ते सात स्वॅब कलेक्शन सेंटर्स करणार बंद
पुणे -करोना संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका सहा ते सात स्वॅब कलेक्शन सेंटर बंद करणार आहे. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने दिला आहे.
करोनाचा संसर्ग कमी झाल्याने बाधितांची संख्याही कमी झाली आहे. पर्यायाने संशयितांच्या टेस्टही कमी झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने हे सहा ते सात स्वॅब कलेक्शन सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून बाधित संख्या, सक्रिय बाधित, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. याशिवाय, गंभीर रुग्णसंख्याही कमी झाली आहे. मुळात बाधितच कमी झाल्याने त्याच्या आजूबाजूला, संपर्कात असलेल्यांची स्वॅब टेस्ट करणे बंद झाले आहे. सध्या महापालिकेचे 18 स्वॅबसेंटर्स आहेत. त्यातील ज्या भागात स्वॅब कलेक्शन कमी होत आहे, तेथील कलेक्शन सेंटर्स बंद करण्याचे प्रस्तावित केले आहे. याशिवाय, एखाद्याला लक्षणे आढळल्यास त्याला अन्य ठिकाणच्या केंद्रात जाऊन स्वॅब देण्याची मुभा असणार आहे.
करोना पुणे जिल्ह्याचा आढावा
करोनाची पहिली लाट ही 9 मार्च ते सप्टेंबर 2020 दरम्यान सात महिने चालली. यादरम्यान करोनाची पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण असा जिल्हा एकूण रुग्णसंख्या 2 लाख 87 हजार रुग्ण आढळून आले आणि 5 हजार 689 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर फेब्रुवारी 2021 पर्यंत बाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूही आटोक्यात होते. दुसरी लाट ही फेब्रुवारी ते मे 2021 दरम्यान चार महिने होती. यादरम्यान जिल्ह्यात 6 लाख 22 हजार बाधित आढळले. म्हणजेच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या तिप्पट वाढली; तर मृत्यू 4 हजार 490 असे पहिल्या लाटेच्या तुलनेत कमी होते.तिसरी लाट ही 22 डिसेंबर 21 ते 15 फेब्रुवारी 22 पर्यंत म्हणजेच सात आठवडे चालली. यादरम्यान पुणे जिल्ह्यात 2 लाख 81 हजार बाधित रुग्ण आढळून आले. तर, यादरम्यान केवळ 326 रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजेच तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्याही कमी होती आणि मृतांची संख्या कमी होती. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात बाधित संख्या 14 लाख 50 हजार झाली असून, 20 हजार 157 जणांचे मृत्यू झाले आहेत.
सध्या बाधितांची संख्याही कमी झाली आहे. याशिवाय, लक्षणे असलेल्या संशयितांची संख्याही कमी झाली आहे. सध्या रोज अडीच हजारांच्या आसपास स्वॅब कलेक्शन होते. तिसऱ्या लाटेच्या वेळी आपण 27 हजारांपर्यंत स्वॅब कलेक्शन केले आहे. लक्षणे असलेल्यांची संख्या पुन्हा वाढताना दिसल्यास पुन्हा हे सेंटर्स सुरू करता येऊ शकतात. डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
दोन ते तीन आठवड्यांपूर्वीपासून तिसरी लाटही ओसरू लागल्याने जंबो हॉस्पीटल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याठिकाणी असलेले बेड आणि अन्य उपचार साहित्यांची नोंदणी करून ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे साहित्य अन्य रुग्णालयांत गरजेनुसार दिले जाणार आहे. – रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
दुसरी लाट
दुसऱ्या लाटेत ऑक्सीजन आणि रेमडेसिव्हिर इंजक्शनच्या पुरवठ्याचे संकट निर्माण झाले होते. त्यावर मात केली. तसेच ऑक्सिजन अभावी रात्रीतून रुग्ण अन्य रुग्णालयात हलवण्याची कसरतही महापालिकेने केली. या पार्श्वभूमीवर नायडूसह अन्य रुग्णालयांतही स्वत:चे ऑक्सीजन प्लॅंट उभारले. उद्योगांसाठी लागणारा ऑक्सीजन उपचारासाठी वळवला. प्रसंगी रेल्वेनेही बल्लारी येथून मागवण्यात आला. तसेच ऑक्सीजनची गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. यामुळे ऑक्सीजनचा तुटवडा पंधरा दिवसांत कमी झाला. मात्र दुसऱ्या लाटेची तीव्रता इतकी भयानक होती की, त्यामध्ये अनेक जवळच्या, नात्यातील व्यक्तीचे मृत्यू पहावे लागले. आबाल, वृद्ध, तरुण अनेकांना यामध्ये जीव गमवावे लागले. नव्य व्हेरियंटचा सामना करावा लागला आणि ही लाट सगळ्यात दु:खदायक ठरली.
तिसरी लाट
जून 2021 मध्ये दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर 22 जूनपासून जम्बो हॉस्पीटल बंद करण्यात आले. मात्र, तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे जम्बो हॉस्पीटल पूर्ण काढून न टाकता तसेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी जानेवारीमध्ये करोनाची तिसरी लाट आली. तिसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा दर हा पहिल्या दोन लाटांपेक्षा अधिक राहिला. मात्र जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरण मोहीम आणि बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने अनेकांवर घरीच उपचार झाले. सर्व रुग्णालयांतील बरेच बेड रिक्त रहात असल्याने सर्व तयारीनिशी उभे असलेल्या जम्बो हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करण्याची गरज पडली नाही.