पुणे – महापालिकेच्या मिळकतकराच्या उत्पन्नाचे चाक रूतल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या महापालिकेला बांधकाम विभागाच्या महसुलाने तारले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात (1 एप्रिल ते 9 ऑक्टोबर) या कालावधीत या विभागास तब्बल 916 कोटींचा महसूल मिळाला आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच यंदाही या विभागाला चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाने आधी जकात आणि नंतर एलबीटी बंद केल्याने महापालिकेकडे केवळ मिळकतकर आणि बांधकाम विभाग हे दोनच हक्काचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. त्यात, यंदाच्या वर्षी मिळकतकराची 40 टक्के सवलतीचा वाद आणि त्यानंतर या विभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा आलेल्या असल्या तरी बांधकाम विभागाला चांगला महसूल मिळाला आहे.
महापालिकेच्या 2023-24 च्या अंदाजपत्रकात पालिका आयुक्तांनी या विभागास 1604 कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार, या विभागाने पहिल्या सहा महिन्यात 802 कोटींचा महसूल मिळविण्याचे नियोजन केले होते. पण प्रत्यक्षात 916 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले आहे.
टीओडीतून 265 कोटींचा महसूल
या शिवाय, शासनाने मेट्रो स्थानकांच्या 500 मीटर परिघात टीओडीची सवलत दिली असून त्यातूनही महापालिकेस जवळपास 265 कोटींचा निधी मिळाला आहे. हा निधी महापालिका आणि महामेट्रोमध्ये विभागून दिला जाणार असून या निधीतून महापालिका या भागात नागरि सुविधा उपलब्ध करून देणार आहे.