पुणे – “शासनानेच “निर्बंधमुक्त’ उत्सवाची घोषणा केली होती. तरीही महापालिकेने नोटीस बजावून आपल्याकडून दंड आणि विद्रुपीकरण शुल्क इत्यादींची मागणी करणे बेकायदेशीर व चुकीचे आहे. वसुली करण्याबाबत केलेला उल्लेखही बेकायदेशीर आहे. या प्रकरणी बजाविलेली नोटीस तातडीने रद्द करावी,’ अशी मागणी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडे केली आहे.
दहीहंडी ते गणेशोत्सव काळात शहरात लावण्यात आलेल्या रनिंग मांडवांवरील जाहिराती बेकायदेशीर असल्याचा कथित उल्लेख करत आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी उद्योजक बालन यांना 3 कोटी 20 लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली होती. या नोटीसप्रकरणी बालन यांनी महापालिकेनेच वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचा दाखला देत ही कारवाई चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच “ही नोटीस मंडळांना देणे अपेक्षित असताना जाणूनबुजून वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करण्याकरता दिली आहे,’ असाही दावा बालन यांनी पत्रात केला आहे.
बालन यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात “महापालिकेकेनेच जाहिरात शुल्क माफ केल्याचा पुरावा देत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहे. या पत्रानुसार सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी बैठक घेत सार्वजनिक उत्सवात देखावे सादर करण्यास नि:शुल्क मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच महापालिकेकडूनही जानेवारी 2023 मध्ये उत्सवांबाबत गृहविभागास पाठविलेल्या पत्रात गणेशोत्सवात रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सवमंडप, स्टेजकरिता पूर्वीपासूनच कोणतेही जाहिरात परवाना शुल्क आकारण्यात येत नसल्याचे लेखी कळविले आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत गणेशोत्सव मंडळाना रनिंग मांडवासाठी कोणतेही जाहीरात शुल्क आकारले जाणार नसल्याचे पालिकेनेच स्पष्ट केल्याचे बालन यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
“नोटीसबाबत पुनीत बालन यांनी संबंधित विभागाकडे खुलासा केला आहे. संबंधित खात्याकडून त्याबाबत तपासणी तसेच चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल.” – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका