कोव्हॅक्सिनचा तुटवडा कायम
पुणे – करोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनचा तुटवडा अद्याप कायम असून शुक्रवारीही कोव्हॅक्सिनचे डोसचे केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. 15 ते 18 वर्षे वयोगटातील कुमारवयीनांचे लसीकरण सुरू झाले आणि सुरूवातीला कोव्हॅक्सिनच्या डोसचा पुरेसा साठा होता.
मात्र डिसेंबर, जानेवारीपासून डोस कमी मिळू लागल्याने महापालिकेला याची केंद्र संख्याही कमी करावी लागली. या कुमारवयीनांना कोव्हॅक्सिन द्यायचे आदेश असल्याने दररोजचे किमान सात ते आठ हजार कुमारवयीनांचे लसीकरण केले जात आहे. याशिवाय शाळांमध्येही जाऊन लसीकरण केले जात आहे.
कोव्हॅक्सिन लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने या मोहिमेला खीळ बसली आहे. त्यातून आता विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. त्यामुळे आधी हे डोस मिळाले असते तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.