पुणे : रस्ते दुरूस्तीचे निकष आणि कामाच्या गुणवत्तेला हरताळ फासत महापालिकेकडून अवघ्या दोन दिवसांपूर्वी भर पावसात दुरूस्त करण्यात आलेला लक्ष्मी रस्ता अखेर काही तासातच उखडला आहे, या रस्त्यावर नव्याने केलेल्या डांबरीकरणावर खड्डे पडले असून अनेक ठिकाणी खडी रस्त्यावर आल्याने वाहने घसरू लागली आहेत, एवढच काय कमी म्हणून या रस्त्यावर रांका ज्वेलर्सच्या समोर हा रस्ताही पावसाने खचला असून काही वाहने त्यात अडकल्याचे प्रकार घडले आहेत.
शहरातील करोना रूग्णसंख्या कमी झाल्याने 1 जून पासून शहरातील अत्यावश्यक सेवांसह, इतर सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय महापालिकेने सोमवारी (31 मे) रोजी जाहीर केला. त्यामुळे मध्यवर्ती पेठांमधील खोदलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे काम महापालिकेच्या पथ विभागाने सोमावरी भर पावसात हाती घेतले.
मुसळाधार पाऊस पडत असतानाही लक्ष्मी रस्त्यावर भर पावसात सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रस्ता डांबरीकरण करण्यात आले, त्यानंतर मंगळवारी अनलॉकमुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वर्दळ होती. परिणामी मंग़ळवारी दिवसभरात हा केलेले हे डांबरीकरणाचे काम उखडून गेले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तर सर्वत्र खडी पसरली आहे. एवढच नाही तर लक्ष्मी रस्ता अनेक ठिकाणी खचलेला असल्याचे बुधवारी दुपारी दिसून आले. त्यामुळे अशा प्रकारे निकृष्ट काम करून पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.