पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणार्या स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे महापालिकेने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. २०२२-२३ या वर्षांसाठी एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महापालिकेने देशात १० क्रमांक पटकावला आहे.
तर सलग सातव्या वर्षी इंदोर शहर पुन्हा एकदा देशात पहिले आले आहे. मागील वर्षी पुणे महापालिका २० व्या क्रमांकावर होती. तर, या वर्षी महापालिकेस पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी फाईव्ह स्टार रॅकिंग मिळाले आहे. क़ेंद्र शासनाच्या वतीने गुरूवारी दिल्लीत ही यादी जाहीर करण्यात आली.
महापालिकेस यंदा पंचताराकींत शहराचे मानांकन मिळाले आहे. तर, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुणे देशात नवव्या क्रमांकावर आले आहे. या अभियानाचा पुरस्कार केंद्रीय नगरविकासमंत्री हरदिप सिंग पुरी यांच्या हस्ते महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्विकारला. अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमणार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, माजी उपायुक्त आशा राऊत यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या अभियानात २०२२ मध्ये महापालिका २० व्या क्रमांकावर फेकली गेल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदरी उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०२३ पर्यंंत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकसहभाग वाढविणे तसेच घरोघरी संकलनासह, १०० टक्के प्रक्रीयेवर भर देत उपाय योजना राबविल्या होत्या. तर, राऊत यांच्या बदलीनंतर उपायुक्त संदीप कदम यांनी दंडात्मक कारवाई तसेच लोकसहभागावर भर दिला. याचा फायदा महापालिकेस झाला.
महापालिकेचे रिपोट कार्ड
केंद्रशासनाने महापालिकेस पुढील प्रमाणे टक्केवारी दिली
– घरोघरी कचरा संकलन : ९९ टक्के
– जागेवर वर्गीकरण – ९७ टक्के
– कचरा प्रक्रीया करणे – १०० टक्के
– निवासी भाग स्वच्छता – १०० टक्के
– बाजारपेठ स्वच्छता – ९९ टक्के
– जलस्त्रोत स्वच्छ्ता – १०० टक्के
“या मानांकनामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे या पुढे आम्हाला नागरिक, राजकीय प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचा सहभाग आवश्यक असून पुणे शहराचे मानांकन आणखी सुधारण्यास मदत होणार आहे.” – संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग