पुणे – शहरातील महापालिकेच्या यंत्रणेकडे कचरा न देता उघड्यावर टाकणे आणि साठून राहणार्या ठिकाणांमध्ये (‘क्राॅनिक स्पाॅट्स’) मध्ये हडपसर- मुंढवा आणि नगररस्ता- वडगांव शेरी या दाेन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक अस्वच्छता असलेली ठिकाणे आढळून आली आहेत. महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांसह, स्वच्छ संस्थेने केलेलेल्या सर्वेक्षणात सुमारे ९१३ क्राॅनिक स्पाॅट आढळून आले असून त्यातील तब्बल २८४ स्पाॅट या दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आहेत.
त्यामुळे, महापालिका प्रशासनाकडून या क्षेत्रीय कार्यालयांंसह, इतर ठिकाणांच्या स्पाॅट कमी करण्याची उपाय योजना करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत १६१ स्पाॅट कमी करण्यात आले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
महापालिकेकडून शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी उपाययोजना केल्या जात असून घरोघरी जाऊन कचरा संकलनावर भर दिला जात आहे. मात्र, त्यानंतरही अनेक भागात रस्त्यावरच अथवा आडोशाच्या ठिकाणे कचरा टाकला जात असल्याचे समोर आल्याने क्रॉनिक स्पॉट्सच्या स्वच्छतेचा दैनंदिन अहवाल सध्या गाेळा केला जात आहे. विशेषत: महामार्गालगत असलेल्या भागात या स्पाॅट्सची संख्या अधिक असून, वारजे, औंध, हडपसर, नगर रस्ता या क्षेत्रीय कार्यालयाच्या भागातून हे महामार्ग जात आहे. या महामार्गालगत नागरिक माेठ्या प्रमाणावर कचरा टाकत असल्याचे आढळून आले आहे.
क्राॅनिक स्पाॅटवर पडणारा कचरा गाेळा करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या भागात लक्ष ठेवले जात असून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. कचरा गाेळा करणाऱ्यांकडे कचरा का दिला जात नाही, याची माहिती नाेंदवून घेतली जात आहे. या नागरिकांना कचरा गाेळा करणाऱ्यांकडे कचरा देण्यासाठी प्राेत्साहन दिले जाते. या स्पाॅट्सवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रांगाेळी काढली जाते, तसेच तेथे कुंड्या ठेवून सुशाेभीकरण केले जात आहे.
कंटेनर मुक्तीला हरताळ
महापालिकेचा समावेश देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये झाल्यानंतर पाच वर्षांपूर्वी पुणे महापालिकेकडून शहरात कंटेनर मुक्तीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर शहरातील सर्व कचरा कंटेनर काढून घेत महापालिकेने संबंधित परिसरात घरोघरी जाऊन कचरा संकलनाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, काही दिवस त्याला प्रतिसाद मिळाला असला तरी नंतर पुन्हा शहरात उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याचे महापालिकेच्या या सर्वेक्षणातून समोर आले आहे.