पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि योग संशोधन, प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या रामकुमार राठी समूह यांच्याशी सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. या करारांतर्गत योग संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राद्वारे योगामुळे होणाऱ्या आरोग्यातील सुधारणांचे पुराव्यानिशी संशोधन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी, आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक प्रा.भूषण पटवर्धन, राठी समूहाचे संचालक राहुल राठी, न्यूयॉर्क विद्यापीठाचे प्रा. रघु सुंदरम, प्र-कुलगुरू डाॅ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डाॅ. संजय ढोले, आरोग्य विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अभय कुदळे आदी उपस्थित होते.
योग जागतिक स्तरावर स्वीकारला गेला आहे. रामकुमार राठी ग्रुप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली योग संशोधन आणि यासंबंधी शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देणार असल्याचे राठी समूहाचे संचालक राहुल राठी म्हणाले. या सामंजस्य करारांतर्गत शिक्षण आणि प्रशिक्षण, सेवा, संशोधन प्रकल्प, विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार, प्रकाशने आणि विस्तार कार्यक्रम यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.