पुणे, दि. 11 – कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गातील शिवाजीनगर येथे मेट्रोच्या भूमिगत स्थानकासाठी एसटीची चार एकर जागा देण्यात आली होती. त्यासाठी बसस्थानक पाडण्यात आले. तेथेच मेट्रोचे भुयारी स्थानक तयार होत आहे. मात्र, आता येथे एसटी स्थानकाचे बांधकाम कोणी करायचे? यावरून वादाला तोंड फुटले आहे. महामेट्रोने स्थानकाचे काम करण्यास नकार दिला आहे. तसेच वाकडेवाडी येथील पर्यायी स्थानकाचे भाडे देणेही बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाची अडचण वाढली आहे.
असा आहे वाद
मेट्रोचे काम होईपर्यंत शिवाजीनगर बसस्थानक वाकडेवाडी येथे नेण्यात आले. शिवाजीनगर येथील काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी जागेचे भाडे मेट्रो देणार होती. मात्र, याबाबत दोन्ही विभागांत केवळ तोंडी चर्चा झाली. त्यामुळे मेट्रोने भुयारी स्थानक बांधून झाल्यानंतर वरील जागा पुन्हा एसटीला दिली आहे. मात्र, ती पूर्णत: रिकामीच आहे. मेट्रोने आधीचे स्थानक पाडल्याने नवीन स्थानकही बांधून द्यावे, अशी मागणी आता एसटीने केली आहे. मात्र, महामेट्रोने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे महिनाभरापासून ही जागा रिकामीच पडून आहे. त्यावर बांधकाम कोणी करायचे? यावरून वाद आहे.
शिवाजीनगर एसटी स्थानक हे आमच्यासाठी
महत्त्वाचे आहे. महामेट्रोसोबत झालेल्या करारानुसार त्यांचीच हे स्थानक उभारून देणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप यावर ते केवळ चर्चाच करत आहेत. – शेखर चन्ने, संचालक, एसटी महामंडळ
बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव नसून केवळ बेसमेंट पार्किंग उभारण्याचा करार झाला आहे. त्यानुसार, आम्ही वरील जागा रिकामी केली आहे. एसटीने त्या ठिकाणी एका महिनापूर्वीच काम सुरू करणे अपेक्षित होते. – डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो