पुणे, दि. 11 -मार्केट यार्डात फिरणाऱ्या मोकाट जनावरांनावर अखेर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. बाजार समिती आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे आता बाजार घटकांना मोकाट जनावरांच्या त्रासातून दिलासा मिळणार आहे.
भुसार, फळे, फुले आदी शेतमालाचा व्यापार होतो. या व्यापारातून बाजारात दररोज फळे-भाजीपाल, हलक्या दर्जाचे अन्नधान्य आदी प्रकारचा कचरा निर्माण होतो. बाजार समिती प्रशासन ठेकेदाराव्दारे दररोज बाजाराच्या ठरलेल्या वेळांनुसार कचरा उचलण्याचे काम करते. फळे-भाजीपाला बाजार दुपारी संपतो. त्यानंतर कचरा उचलण्याचे काम सुरू होते. मात्र, प्रामुख्याने भुसार बाजार दिवसभर सुरू असतो. त्यामुळे सकाळी आणि दुपारच्या ठराविक वेळेत मोकाट जनावरे, डुकरांचा वावर वाढला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन बाजार घटकांना याचा त्रास व्हायचा. याबाबत बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, मोकाट जनावरांमुळे अपघातांची शक्यता असते. मार्केट यार्डात विशेषत: गुळ-भुसार बाजारात विशिष्ट वेळेत मोकाट जनावरे येतात. त्यामुळे बाजार घटकांना त्रास होतो. याबाबत अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्याशी संपर्क साधून अशा मोकाट जनावरांवर कारवाई सुरू केली आहे. कोंडवाडा विभागाने मंगळवारी मार्केयार्डातून मोकाट जनावरे ताब्यात घेतली आहेत. आता संबंधित जनावरांचा मालक कोंडवाडा विभागाशी संपर्क साधेल. त्यानंतर मार्केटयार्डात जनावरे सोडणारे
समोर येतील.