हडपसर – पैलवान महेंद्र गायकवाड हा मानाच्या राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड या मोठ्या कुस्तीपटूंमध्ये ही अत्यंत अटीतटीची फायनल कुस्ती रंगली. महेंद्र गायकवाड याने पृथ्वीराज मोहोळवर चुरशीची एकतर्फी मात देऊन मानाचा ‘सेना केसरी 2024 किताब’ पहिल्यांदाच पटकावला आहे. अत्यंत कडव्या झालेल्या लढतीत गायकवाड याने बुलेटसह मानाची गदा पटकावली.
हडपसर येथील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर या स्पर्धा पार पडल्या. राज्यातील जवळपास 600 पैलवानांनी यात सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी या भव्य राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने या भव्य स्पर्धा पडल्या. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद , शहरप्रमुख नाना भानगिरे, उद्योजक बाळासाहेब तात्या भानगिरे व मान्यवरांच्या हस्ते पुण्याचा विजयी पैलवान महेंद्र गायकवाड याला पाच लाख रुपये रोख इनामासह, सेनाकेसरी किताब, सुपर बुलेट गाडी आणि मानाची चांदीची गदा बहाल करण्यात आली.
तर सोबतच उपविजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ याला तीन लाख रोख, उपसेनाकेसरी किताब देवून गौरविण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, युवा सेना राज्य सचिव किरण साळी, निलेश घारे, निलेश गिरमे, महिला आघाडी शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी,लक्ष्मण आरडे, सुनिल जाधव, राजाभाऊ भिलारे,संतोष राजपूत, अभिजीत बोराटे, नाना तरवडे,राजेंद्र भानगिरे,अभिमन्यू भानगिरे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, करण भानगिरे, प्रज्वल भानगिरे, आकाश भानगिरे, अमर घुले, विकी माने, दिपक कुलाळ, नितीन लगस व असंख्य शिवसैनिक, या दरम्यान कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथे शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी अतिशय उत्तम नियोजन करत सेना केसरीच्या निमित्ताने कुस्ती मैदान सलग तीन दिवस आयोजित केले. त्याला राज्यातील पैलवानांनी उत्तम प्रतिसाद दिला. वस्ताद, मल्ल आणि कुस्ती शौकिनांकडून आयोजनाबद्दल नाना भानगिरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.