पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशासाठी कोणती शाळा मिळाली याबाबतचे “एसएमएस’ 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर पाठविण्यात येणार आहे.
विद्या प्राधिकरण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, महेश पालकर, विद्या प्राधिकरणाचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहसंचालक देविदास कुलाळ उपस्थित होते.
राज्यात पुण्यातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीसाठी 72 जागांची प्रवेश क्षमता असून, यासाठी सर्वाधिक 3 हजार 608 अर्ज प्राप्त झाले होते. पुणे जिल्ह्यात 936 शाळांमधील 15 हजार 655 प्रवेशाच्या जागांसाठी सर्वाधिक 77 हजार 531 अर्ज दाखल झाले होते. तर सिंधुदुर्गमध्ये 49 शाळामधील 287 प्रवेशाच्या जागांसाठी 232 एवढे सर्वात कमी अर्ज प्राप्त झाले होते.
पालकांनो, तुमच्यासाठी..
निवड यादीत स्थान मिळविलेल्या बालकांच्या पालकांनी दि. 13 ते 25 एप्रिलपर्यंत महापालिका, पंचायत समिती स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी. 30 एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शाळांमध्ये जावून प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
“आरटीई’ प्रवेश प्रक्रियेतील क्लिष्टता दूर करुन पारदर्शकता आणण्याबाबत सुधारणा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. “आरटीई’ प्रवेशासाठी एजंटगिरी करुन गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
-सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त