भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांचे कृत्य
भरदुपारी घडलेल्या घटनेने वारजे परिसरात खळबळ
पुणे – सराफा दुकानातून चोरट्यांनी अडीच किलो सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी भरदुपारी वारजेतील गणपती माथा येथे घडली. चोरट्यांनी शेजारचा गाळा भाड्याने घेतला होता. दरम्यान, सराफी दुकान बंद झाल्यानंतर भिंतीला भगदाड पाडून ही चोरी केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी, आनंदकुमार वर्मा (वय 34, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वर्मा यांचे माऊली ज्वेलर्स हे दुकान आहे. त्यांच्या दुकानात एक कामगार आहे. दुकानाशेजारी पूर्वी बेकरी होती. पण, पंधरा दिवसांपूर्वीच ती बंद केली होती.
संबंधित मालकाने आठ दिवसांपूर्वी एका व्यक्तीला मसाल्याचे दुकान सुरू करण्यासाठी हा गाळा भाड्याने दिला होता. त्यामुळे तेथे फर्निचरचे काम सुरू केले होते. शुक्रवारी वर्मा हे दुपारी अडीचच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. त्यावेळी शेजारच्या गाळ्याचे शटर अर्धवट उघडे होते.
दरम्यान, वर्मा हे सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दुकानात आले, तेव्हा त्यांना भिंतीला भगदाड पाडून दुकानातील दागिने चोरून नेल्याचे आढळले. दागिन्यांचे बॉक्स अस्ताव्यस्त पडले होते. सर्व दागिन्यांचे मोजमाप केल्यानंतर 2 किलो 465 ग्रॅम वजनाचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आरोपींचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. ए. मुंढे तपास करत आहेत.