पुणे : आठ वर्षीय पीडितेची आई फितुर झाली असतानाही चिमुकलीचा लैंगिक छळ करणाऱ्या नात्यातील २४ वर्षीय मुलाला न्यायालयाने दणका दिला आहे. ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांनी सुनावली. दंड न भरल्यास त्याला एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली.
ही घटना १८ जुलै २०२१ रोजी चतृ:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. विशेष म्हणजे पीडितेच्या आईनेच याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. नंतर तीच फितुर झाली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभुते आणि शुभांगी देशमुख यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक सविता भागवत आणि संतोष कोळी यांनी या प्रकरणाचा तपास केला.
न्यायालय कामकाजासाठी पोलीस उपनिरीक्षक रेणूसे, हवालदार तुपसुंदर आणि शिपाई पुकाळे यांनी मदत केली. फिर्यादी किराणा दुकान चालविते. घटनेच्या दिवशी तिला भावजयने फोन करून दुकानातून घरी बोलवून घेतले. आरोपीने घरात बोलावून ८ वर्षीय मुलीशी लैंगिक छळ केल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबत पोलिसात फिर्याद देण्यात आली होती.