पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी तसेच स्लॉट बुकिंग करण्यात झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व झोपडपट्यांतमध्ये स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यासाठी 390 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
लशींची उपलब्धता वाढताच ही लसीकरण मोहीम पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
पण, ऑनलाइन बुकिंग मिळत नसल्याने अनेकांच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये विशेषत: झोपडपट्टीतील तरुण, महिलांचा समावेश आहे. त्यामुळे थेट केंद्रावर लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली जात होती.
त्यानुसार प्रशासनाने झोपडपट्ट्यांची यादी निश्चित केली असून, तेथे लसीकरणासाठी 390 जागा निश्चित केल्या आहेत. त्या अंतर्गत प्रत्येक केंद्रावर परिसरातील लोकसंख्येनुसार किमान 10 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे. मात्र, प्रत्यक्षात ही लसीकरण मोहीम लसींच्या उपलब्धतेनुसार सुरू केली होईल.
18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाची नोंद ऑनलाइन होत असल्याने झोपडपट्टीतील नागरिक वंचित राहत आहेत. त्यामुळे स्वतंत्र लसीकरण यंत्रणा सुरू करण्याची मागणी अनेकांकडून केली जात होती. प्रशासनाने त्यासाठी 390 ठिकाणे निश्चित केली आहेत.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा