पुणे – पुण्यातील उच्चभ्रु परसिरात रेकी करून घरफोड्या केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्याची परराज्यातील चोरट्यांनी संपूर्ण काळजी घेतली होती. विमानाने पुण्यात दाखल झाल्यानंतर मोबाईल न वापरत फेसबुकद्वारे एकमेकांशी ते संपर्कात राहिले होते. गुगलवर परिसराचा शोध घेऊन रात्रीच्यावेळी रेकी केली. पळून जाताना ठिकठिकाणी रिक्षा बदलली. मात्र, थांबलेल्या लॉजवर त्यांनी वापर केलेला केवायसी क्रमांक पोलिसांच्या हाती लागला अन् त्याच्या हातात बेड्या पडल्या.
हैद्राबादमधील चोरट्याला येरवडा आणि चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली. चोरट्याने चतु:शृंगी आणि येरवडा भागातील उच्चभ्रू सोसायटीतून 60 लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पसार झालेल्या चोरट्याचा सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे माग काढून त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली.
नरेंद्र बाबू नुनसावत ( 27, रा. मीर पेठ, हैद्राबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार सतीश बाबू करी ( 35, रा .हैद्राबाद) पसार झाला आहे. नरेंद्रविरुद्ध तेलंगणा, हैद्राबाद, तिरुपती पोलीस ठाण्यात 25 गुन्हे दाखल आहेत. येरवडा आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उच्चभ्रू सोसायटीत नरेंद्रने घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
कल्याणीनगर भागात बंद बंगल्यात शिरुन आरोपी नरेंद्र आणि त्याचा साथीदार सतीशने दहा लाखांचे दागिने आणि रोकड चोरुन नेली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरात दोन घरफोड्या झाल्या होत्या. चोरट्यांनी 50 लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. येरवडा पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. पोलिसांनी जवळपास 300 ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांनी केलेले चित्रीकरण पडताळले होते.
तांत्रिक तपासात चोरटे तेलंगणातील असल्याची माहिती मिळाली. नरेंद्रला तेलंगणातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून अडीच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नरेंद्र आणि साथीदार सतीशची कारागृहात ओळख झाली होती. तेलंगणात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याने दोघांनी पुण्यातील उच्चभ्रू भागाचा संकेतस्थळावर शोध घेऊन घरफोड्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, असे बोराटे यांनी सांगितले.
अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे,सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम,बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, अमजद शेख, अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, किरण घुटे, सूरज ओंबासे, सागर जगदाळे, श्रीकांत वाघोले, इरफान मोमीन, ज्ञानेश्वर मुळे, प्रदीप खरात यांनी ही कामगिरी केली.
- फेसबुक,गुगलद्वारे शोध घेऊन रेकी करायचा
- हैद्राबादमधील चोरट्याने केली येरवड्यात ६० लाखांच्या एवजाची चोरी
- तेलंगणा, आंध्र प्रदेशात सुमारे ३० गुन्हे
- आरोपी नरेंद्र आणि सतीशविरुद्ध तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात घरफोडीचे प्रत्येकी 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत. आरोपी नरेंद्र एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो तेलंगणात चालक म्हणून काम करत होता. पोलीस भरतीसाठी तो प्रयत्न करत होता. पोलीस भरतीत तो उत्तीर्ण झाला होता. चारित्र्य पडताळणीत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न भंगले.
“सतीश करी हा मुख्य सूत्रधार असून, त्याने नरेंद्र नुुनसावत याच्यासोबत मिळून या घरफोड्या केल्या आहेत. नरेंद्रला अटक करण्यात आली असून, चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दिवसा रेकी करून चोरट्यांनी रात्रीच्यावेळी या घरफोड्या केल्या आहेत.” -बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा