गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेच्या हालचाली
पुणे – गेल्या दोन वर्षांत टीईटी परीक्षामध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी यापुढे ऑनलाइन घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आगामी टीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आता टीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने यातील गैरप्रकारावर पायबंद बसण्याची चिन्हे आहेत.
प्राथमिक शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून दर वर्षी संबंधित परीक्षा ऑफलाइन घेण्यात येत होती. गेल्या दोन वर्षांत टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर, अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी, तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीईटी या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येतात.
त्याच धर्तीवर राज्याची टीईटी देखील ऑनलाइन घेण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी “आयबीपीएस’ कंपनीमार्फत परीक्षेचे नियोजन आहे. त्यासाठीचे वेळापत्रक आणि अन्य बाबी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये स्पष्ट करण्यात येणार आहेत.
टीईटी ऑनलाइन झाल्यास फायदे
* निकाल लवकर जाहीर होतील.
* परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसेल
* मनुष्यबळाचा वापर कमी होणार
* परीक्षा पद्धतीत पारदर्शकता येईल
* ऑफलाइन परीक्षेत होणाऱ्या चुका टळणार